साखरेपाठोपाठ कांदा महागणार; सरकारी गोदामांतील कांदा सडू लागला

सरकारी बफर स्टॉकमधील ३० टक्के कांदा खराब झाल्याने आणि नव्या पिकाची आवक येण्यास विलंब झाल्याने कांद्याचे दर वाढण्याची चिंता आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
23 mins ago
साखरेपाठोपाठ कांदा महागणार; सरकारी गोदामांतील कांदा सडू लागला

कोल्हापूर : साखरेच्या दरांपाठोपाठ आता कांद्याचे भाव वधारण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गृहीणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कांद्याचे दर वाढत असताना, दुसरीकडे सरकारच्या बफर स्टॉकमध्ये ठेवलेला सुमारे ३० ते ४० टक्के कांदा खराब होऊ लागला आहे. केंद्र सरकारकडून नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) यांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या १.२ लाख टन कांद्यापैकी मोठा साठा सडल्यामुळे बाजारपेठेत अचानक पुरवठा कमी होऊन दर आणखी भडकण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

मार्च-एप्रिल महिन्यात कांदा काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा राहिला होता. त्यानंतर गोदामांमधील प्रचंड उष्णता आणि दमट वातावरणामुळे कांदा सडणे व त्याला मोड येण्याचे प्रकार घडले आहेत. त्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या 'अगेती खरीप' कांद्याच्या लागवडीला नाशिक व कर्नाटकातील मुसळधार पावसामुळे ३ ते ४ आठवड्यांचा विलंब झाला आहे. त्यामुळे आता नवे पीक ऑगस्टऐवजी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मोठ्या शहरांमधील कांद्याची महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा विविध राज्यांत पाठवण्यास सुरुवात केली आहे. लासलगावहून ४५० मॅट्रिक टन कांदा घेऊन 'कांदा एक्सप्रेस' दिल्लीला रवाना झाली असून, आता मनमाडहून सुमारे ८०० टन कांदा चेन्नईला पाठवण्याचे नियोजन आहे. या निर्णयामुळे दिल्ली आणि चेन्नईसारख्या शहरांत कांदा उपलब्ध होणार असला, तरी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी घसरल्याने स्थानिक शेतकरी तीव्र चिंतेत सापडले आहेत.


हेही वाचा
सर्व पहा