पणजी: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (RGP) आपल्या संघटनेची पुनर्रचना करत नव्या राज्य कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या राज्य परिषदेच्या बैठकीत लोकशाही प्रक्रियेचा अवलंब करत आणि निवडणुकीच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, पक्षाच्या राज्य अध्यक्षपदी शविना एस. नाईक शिरोडकर यांची निवड करण्यात आली आहे. गोव्यातील एका प्रादेशिक राजकीय पक्षाचे नेतृत्व महिला अध्यक्षांकडे सोपवण्याची ही दुसरीच वेळ असून, या आधी मगोच्या अध्यक्षपदी शशिकला काकोडकर यांनी काम पाहिले आहे. अवघ्या २६ वर्षांच्या तरुण नेतृत्वाकडे पक्षाची धुरा सोपवून आरजीने युवकांना आणि महिलांना राजकारणात प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले आहे.
पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विपिन नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मेल्विन डिसिल्व्हा आणि प्रेमानंद गावडे यांची अनुक्रमे सरचिटणीस आणि संघटक सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे. याशिवाय जयेंद्रथ पाडोलकर यांची सचिवपदी, तर कॅन्डिडो कोरिया यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाची घटना आणि लोकशाही मूल्यांचे पालन करत पुढील वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नवनियुक्त राज्य अध्यक्ष शविना नाईक शिरोडकर यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, पक्षसंघटना तळागाळापर्यंत मजबूत करणे आणि गोवेकरांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमकपणे मैदानात उतरणे हे आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगितले. गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, नोकरभरतीत गैरव्यवहार, अपघातांचे वाढते प्रमाण आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सर्व मुद्द्यांवरून विद्यमान सरकारविरोधात लढा उभारण्यासाठी पक्ष पुन्हा एकदा संघटित होत असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने पूर्ण तयारी सुरू केली असून, येत्या गणेश चतुर्थीपूर्वी सर्व जिल्हा आणि ब्लॉक कमिट्यांची रचना पूर्ण केली जाणार आहे. याशिवाय, लवकरच राज्यभर व्यापक सदस्यत्व मोहीम (Membership Drive) राबवली जाणार आहे. काँग्रेस पक्षाकडून मिळालेल्या युतीबाबतच्या पत्रावर चर्चा करण्यासाठी अमोल नावेलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष युती समिती (Alliance Committee) स्थापन करण्यात आली असून, आगामी काळात विरोधी पक्षांशी युतीबाबत अधिकृत चर्चा सुरू केली जाईल, अशी माहितीही पक्षाच्या वतीने देण्यात आली.


