रात्रीची अटक बेकायदेशीर; विदेशी महिलेला जामीन

मडगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
30th August, 11:41 pm
रात्रीची अटक बेकायदेशीर; विदेशी महिलेला जामीन

मडगाव : अपवादात्मक परिस्थिती नसताना आणि दंडाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता सूर्यास्तानंतर महिलेला अटक करणे हा कायद्याचा गंभीर भंग ठरतो, असे स्पष्ट करत मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केलेल्या विदेशी महिला उरेन इमॅन्युएल यामतल हिला जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.
संशयित महिला १० जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता दाबोळी विमानतळावर उतरली होती. त्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. तिच्या आगमनाची माहिती पोलिसांना सायंकाळी ६.३० वाजताच मिळाली होती. त्यामुळे कारवाईसाठी पुरेसा वेळ उपलब्ध असतानाही रात्रीची कारवाई करण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले.
नवीन कायद्यानुसार अपवादात्मक परिस्थिती वगळता सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलेला अटक करता येत नाही. अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी तसेच महिला पोलीस अधिकाऱ्याची उपस्थिती आवश्यक आहे. या प्रकरणात अशी परवानगी घेतली नसल्याने न्यायालयाने तपास यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपास यंत्रणेने कागदोपत्री अटक दुसर्‍या दिवशी सकाळी दाखवली असली, तरी विमानतळावर उतरताच उरेन यामतल हिला ताब्यात घेऊन तिच्या हालचालींवर निर्बंध आणले होते. त्यामुळे प्रत्यक्षात तिची अटक रात्री झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
एक लाख बाँड; पासपोर्ट जमा करण्याचे आदेश
न्यायालयाने महिलेला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर आणि तेवढ्याच रकमेच्या दोन हमीदारांवर जामीन मंजूर केला. तिला पासपोर्ट न्यायालयात जमा करावा लागणार असून, परवानगीशिवाय राज्याबाहेर जाता येणार नाही. तसेच आठवडाभरात फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नोंदणी करणे आणि संबंधित देशाच्या दूतावासाला गुन्ह्याची लेखी माहिती देणे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.            

हेही वाचा
सर्व पहा