पणजी : ड्रग्ज सापडलेल्या वाहनात केवळ सहप्रवासी म्हणून प्रवास करणे किंवा वाहनात उपस्थित असणे म्हणजे अमली पदार्थ तस्करीतील सहभाग सिद्ध होत नाही, असे निरीक्षण नोंदवत मेरशी येथील विशेष (एनडीपीएस) न्यायालयाने मोहम्मद अहमद सुहेल आणि मोईद्दीन अब्दुल्ला अम्शिन यांची एमडीएमए तस्करीच्या आरोपातून मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिल्पा पंडित यांनी याबाबतचा आदेश दिला.
गोवा पोलिसाच्या गुन्हा शाखेने १७ मे २०२५ रोजी पाटो-पणजी येथील केंद्रीय ग्रंथालयासमोरील पार्किंगमध्ये ड्रग्जचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची दखल घेऊन तत्कालीन उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन हळर्णकर, हवालदार नित्यानंद हळर्णकर, संदीप मडकईकर, कॉ. समिऊल्ला मकंदर, विनायक सावंत व क्रितेश किनळकर या पथकाने १७ मे रोजी पहाटे ३.३० वा. छापा टाकला.
यावेळी केए-२०-एमबी-११५९ क्रमांकाची बलेनो कार अडवून झडती घेतली असता सुमारे १२ लाख रुपये किमतीचे ९१.९३४ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले. कारमधील तिघांना ताब्यात घेऊन एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी गुन्हा शाखेने तपासपूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सहप्रवासी म्हणून वाहनात उपस्थित असणे हे गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यासाठी पुरेसे नसल्याचे स्पष्ट केले. ठोस पुराव्याअभावी मोहम्मद अहमद सुहेल आणि मोईद्दीन अब्दुल्ला अम्शिन यांची एमडीएमए तस्करीच्या आरोपातून मुक्तता करण्यात आली.
ठोस पुरावा नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद
दोन्ही संशयितांच्या वतीने अॅड. कमलकांत पोवळेकर यांनी युक्तिवाद करताना, ते पैशांच्या वादाशी संबंधित कामासाठी कर्नाटकात गेले होते आणि गोव्यात परतताना त्यांनी केवळ चालकाकडे लिफ्ट घेतली होती, असे सांगितले. वाहनात अमली पदार्थ असल्याची त्यांना माहिती नव्हती. जप्त केलेले ड्रग्ज चालकाजवळ आढळले असून, सहप्रवाशांचा तस्करीशी संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणेने सादर केला नसल्याचे त्यांनी नमूद केले.


