राजेंद्र केरकर यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

पर्यावरण, जैविक संपदेच्या संरक्षणासाठी कराड येथे गौरव

Story: गोवन वार्ता। न्यूज डेस्क |
30th August, 11:52 pm
राजेंद्र केरकर यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

पणजी : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, कराड महाराष्ट्र यांच्यातर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार यंदा गोव्यातील पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांना कराड येथे प्रदान करण्यात आला.

प्रतिवर्षी समितीतर्फे भारताच्या उन्नतीसाठी भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरास जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आजवर साथी भाई वैद्य, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. आ. ह. साळुंखे, सिंधुताई सपकाळ, सत्यपाल महाराज, अंकल सोनवणे, प्रा. बाबूराव गुरव, डॉ. प्रकाश आमटे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

यंदा समितीने या पुरस्कारासाठी गोव्यात तसेच महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील पर्यावरणीय समस्यांविषयी, तसेच तेथील जैविक संपदेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या राजेंद्र केरकर यांची निवड केली होती. सदर पुरस्कार दि. ३० ऑगस्ट रोजी वेणुताई चव्हाण सभागृह, कराड येथे डॉ. शरद गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

केरकर यांनी गोव्यातील पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण, म्हादई बचाव अभियान, महाराष्ट्रात कृष्णा बचाव अभियान राबविले असून, पर्यावरण, इतिहास, संस्कृती त्याचप्रमाणे आदिवासी तसेच पशुपालक समाजाच्या प्रश्नांसंदर्भात ते सातत्याने लेखन करत आलेले आहेत.

केरकर यांनी पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात तरुणांची फौज तयार केली असून हे सर्व युवक पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी स्वतःला झोकून देत आहेत.

पुरस्काराला उत्तर देताना केरकर म्हणाले की, आतापर्यंत हा पुरस्कार केवळ सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला होता परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीने यंदा पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला देऊन एक नवीन पायंडा घालून दिलेला आहे, असे केरकर यांनी सांगितले.

पुरस्कार सह्याद्रीतील प्रत्येक कार्यकर्त्यांचा

हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून सह्याद्रीच्या कुशीत कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा आहे. नेपाळमध्ये सध्या निर्माण झालेला हाहाकार आपण पाहत आहोत. या घटनेतून आपले डोंगर, नद्या आणि निसर्ग सुरक्षित ठेवणे किती गरजेचे आहे, हे निसर्गानेच दाखवून दिले आहे, असे राजेंद्र केरकर यांनी सांगितले.