कुडतरीच्या रुनी मिनेझिसने मिळवला व्यावसायिक वैमानिक परवाना

पालकांना दिले श्रेय : कठोर परिश्रम, प्रशिक्षण, चिकाटीच्या जोरावर मिळवले यश

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
30th August, 11:37 pm
कुडतरीच्या रुनी मिनेझिसने मिळवला व्यावसायिक वैमानिक परवाना

वैमानिक रुनीचे अभिनंदन करताना कुटुंबीय.

मडगाव : कुडतरी येथील रुनी मिनेझिस याने न्यूझीलंडमध्ये व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवत लहानपणापासून पाहिलेले वैमानिक होण्याचे स्वप्न साकार केले आहे. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पालकांकडे वैमानिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक वर्षांच्या कठोर परिश्रम, प्रशिक्षण आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले.
रुनीने आपल्या यशाचे श्रेय पालकांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याला दिले. वैमानिक होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पालकांनी त्याच्या निर्णयाला पूर्ण साथ दिली. दिल्लीत प्राथमिक प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढील प्रशिक्षणासाठी त्याला न्यूझीलंडला पाठवण्यात आले. तेथील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तो आता व्यावसायिक वैमानिक म्हणून कारकीर्द सुरू करण्यास सज्ज झाला आहे.
प्रवासाची आवड असल्याने वैमानिक होण्याचे क्षेत्र आपल्यासाठी आनंददायी असल्याचे रुनीने सांगितले. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच आता व्यावसायिक कारकीर्द घडवता येणार असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला. रुनीचे वडील तथा कुडतरीचे माजी सरपंच रुई मिनेझिस यांनी मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत देवाचे आभार मानले. वैमानिक प्रशिक्षणासाठी लागणार्‍या मोठ्या खर्चाची चिंता असतानाही कुटुंबाने रुनीच्या स्वप्नाला पाठिंबा दिला, असे त्यांनी सांगितले.
रुनीच्या या यशामागे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांचेही मोठे योगदान असल्याचे रुई मिनेझिस याने नमूद केले. या प्रवासात मदत केल्याबद्दल त्यांनी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासह कुटुंबीय आणि मित्रांचे आभार मानले. रुनीच्या मोठ्या बहिणीनेही त्याला या प्रवासात मोलाचे सहकार्य केल्याचे त्याने सांगितले. रुनीने मिळवलेले हे यश मिनेझिस कुटुंबासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.
अडचणींवर मात करत पूर्ण केले प्रशिक्षण
वैमानिक प्रशिक्षणाचा प्रवास आव्हानात्मक असल्याचे रुनीने सांगितले. खराब हवामानामुळे उड्डाणे रद्द होणे, प्रशिक्षणाचा कालावधी वाढणे आणि इंधनाच्या वाढत्या किमती अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, या अडथळ्यांमुळे त्याचा आत्मविश्वास डळमळला नाही. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवत त्याने प्रशिक्षण पूर्ण केले.