पणजी : गोवा सरकारने धर्मांतरविरोधी विधेयक यंदाच्या अधिवेशनात सभागृहात मांडायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. या विधेयकाला विरोधी पक्षांसह सत्ताधारी गटातील काही आमदारांनीही विरोध दर्शवल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
धर्मांतरविरोधी विधेयक सभागृहात मांडले जाणार नसल्याची माहिती आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि डिलायला लोबो यांनी दिली. विधेयकाच्या तरतुदींवरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा सुरू असतानाच सरकारने ते सध्या पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधकांनी विधेयकाला जोरदार आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर सत्ताधारी गटातील काही आमदारांनीही विधेयकाबाबत असहमती व्यक्त केल्याने सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर सर्व बाजूंचा विचार करून विधेयक सभागृहात सादर न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान; गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतरविरोधी विधेयकाला मंजुरी दिली होती. त्याचबरोबर विधानसभा अधिवेशनात विधेयक मांडण्याची तयारी केली होती. मात्र, विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी विरोध दर्शवल्याने हे विधेयक आता बारगळल्यात जमा आहे.


