म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात जून २०२२ ते मे २०२६ या कालावधीत ड्रग्ज तस्करीचे ११ गुन्हे कोलवाळ पोलिसांनी नोंद केले आहेत. तर आतापर्यंत जेलर कृष्णा उसगावकर समवेत एकूण १२ कारागृह कर्मचाऱ्यांवर प्रतिबंधक वस्तू तस्करीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
आमदार वीरेश बोरकर यांनी चालू पावसाळी विधानसभा अधिवेशनावेळी विचारलेल्या प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लिखित स्वरूपात हे उत्तर दिले आहे. वरील ११ ड्रग्ज प्रतिबंधक गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कोकेन, चरस, गांजा व हशीश असे मादक पदार्थ जप्त केले आहे.
कारागृहात प्रतिबंधित वस्तूंच्या तस्करी प्रकरणात सप्टेंबर २०१८ ते जानेवारी २०२६ पर्यंत १२ कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे. यामध्ये कृष्णा उसगावकर (जेलर), प्रदीप कांबळी (हेड गार्ड), प्रकाश गावस (जेल गार्ड), रामा कोरगावकर (जेल गार्ड), नारायण नाईक (जेल गार्ड), महाबळेश्वर परूळेकर (जेल गार्ड), विलास नाईक (जेल गार्ड), शंभू नाईक (जेल गार्ड), बाबू वरक (जेल गार्ड), सूरज गावडे (जेल गार्ड), समीर मोटे (जेल गार्ड), तुळशीदास गडेकर (वॉर्डन) यांचा समावेश आहे.
कारागृहात २०२२ ते जुलै २०२६ पर्यंत कैदी, कारगृह कर्मचारी व इतर मिळून २०८ वेळा मोबाईल, तंबाखू, सिगारेट, ड्रग्ज व इतर प्रतिबंधित वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये २०२२- ८०, २०२३- ५३, २०२४- १५, २०२५- ३८ व जुलै २०२६ पर्यंत २२ प्रकार उघडकीस आलेले आहेत.
२७४ मंजूर पदांपैकी ११९ रिक्त
कोलवाळ कारागृहात कर्मचारी मंजूर संख्याबळ २७४ असून त्यातील फक्त १५५ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली असून ११९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये मॅट्रन व पुरुष परिचारिकांसह (महिला जेलगार्ड) यात वैद्यकीय अधिकारी-२, कल्याणकारी अधिकारी-१, पुरुष परिचारिका (ब्रदर)- ५, महिला परिचारिका- २, हेड वॉर्डन वजा शारीरिक प्रशिक्षक- १, शिंपी प्रशिक्षक- २, साहाय्यक अधीक्षक- ७, हेड मॅट्रन- ३, इलेक्ट्रीशियन- ३, हेड वॉर्डन- ५, वॉर्डन- ६५ व मॅट्रन- १० समावेश आहे.


