१० कोटींच्या ‘आयटीसी’ फसवणूकप्रकरणी कर सल्लागाराला अटक

आर्थिक गुन्हे विभागाची बेळगावात कारवाई; जीएसटी खात्यात फेरफार केल्याचा आरोप

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10 hours ago
१० कोटींच्या ‘आयटीसी’ फसवणूकप्रकरणी कर सल्लागाराला अटक

पणजी :  १०.०६ कोटी रुपयांच्या बनावट ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ (आयटीसी) फसवणूक व आर्थिक अफरातफर प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने (ईओसी) कर सल्लागार नकीब नजीब मुल्ला (बेळगाव, कर्नाटक) याला बेळगावातून अटक केली.
आय. के. एरोअॅम्फिबियस प्रा. लि. कंपनीचे प्रतिनिधी इम्रान साब मडीवाले यांच्या तक्रारीवरून ईओसीने गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार कंपनीने कळंगुट येथे एक रिसॉर्ट चालवावयास घेतला होता. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १ फेब्रुवारी २०२२ रोजी बंद केला होता. त्यानंतर जीएसटीचे शून्य विवरणपत्र दाखल करण्यासाठी कंपनीने रिसाॅर्ट बंद केल्यामुळे नकीब नजीब मुल्ला याची कर सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. कंपनीने त्याला १ फेब्रुवारी २०२२ ते २० जून २०२४ या कालवाधीचा जीएसटी कर भरण्यास सांगितले. त्यासाठी कंपनीने संशयित सल्लागाराला जीएसटी लॉगिन, संवेदनशील माहिती आणि ओटीपीचा अॅक्सेस दिला होता. याचा गैरफायदा घेत त्याने कंपनीच्या जीएसटी खात्यात फेरफार करून कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता कंपनीच्या नावाने १०.०६ कोटी रुपयांचे आयटीसी चुकीच्या पद्धतीने मिळवले.
त्यानंतर सदर रक्कम सरकारकडून मिळाल्यानंतर संशयिताने आपल्या स्वतःच्या 'फेडरल लॉजिस्टिक्स' या कंपनीत वळवून तकारदराची फसवणूक केली. याची दखल घेऊन ईओसीचे निरीक्षक राजाशद शेख यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान संशयित नकीब नजीब मुल्ला याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज मेरशी येथील उत्तर गोवा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
यानंतर संशयित फरार झाला होता. तो बेळगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधीक्षक राहुल गुप्ता आणि फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजाशद शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला अटक करून गोव्यात आणले. त्याला पोलीस कोठडीसाठी १ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
रक्कम स्वतःच्या कंपनीत वळवल्याचा आरोप
सरकारकडून मिळालेली सदर रक्कम संशयिताने स्वतःच्या ‘फेडरल लॉजिस्टिक्स’ या कंपनीत वळवून तक्रारदाराची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रकरणी ईओसीने तपास सुरू केल्यानंतर मुल्ला याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने तो फेटाळला.