‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने ३५.९० लाखांची फसवणूक

सायबर विभागाकडून बंगळुरूमधील भामट्याला अटक

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
10 hours ago
‘डिजिटल अरेस्ट’च्या भीतीने ३५.९० लाखांची फसवणूक

पणजी : सासष्टी तालुक्यातील एका ज्येष्ठ महिलेला अंधेरी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल ३५.९० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने बंगळुरू येथून मोहनकुमार जी. (२५) याला अटक केली. दरम्यान, या फसवणुकीमधील ९.८ लाख रुपये संशयिताच्या बँक खात्यात जमा झाले होते.
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सासष्टी तालुक्यातील ७२ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयितांनी महिलेला व्हॉट्सअॅप कॉल करून आपण अंधेरी पोलीस स्थानकाचे अधिकारी असल्याचे भासवले. तसेच तिचे बँक खाते दहशतवादी कारवायांशी जोडले गेल्याचे सांगितले. कायदेशीर कारवाईची भीती दाखवून प्रकरण मिटविण्यासाठी आयसीआयसीआय आणि बँक ऑफ इंडिया या खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे ३५,९०,२०० रुपये जमा करण्यास भाग पाडले. याची दखल घेऊन निरीक्षक अनुष्का पैबीर यांनी अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल धारकाविरोधात भा. न्या. संं.च्या ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अधीक्षक राजू राऊत देसाई व सहायक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनुष्का पैबीर यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हवालदार अनय नाईक आणि काॅन्स्टेबल सुनील रेनाटी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे बंगळुरूतून मोहनकुमारला अटक केली. गोव्यात आणल्यानंतर मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
संशयिताच्या खात्यात ९.८ लाख जमा
तपासादरम्यान फसवणुकीतील ९.८ लाख रुपये बंगळुरू‍-कर्नाटक येथील संशयित मोहनकुमार यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले. ६ ते १२ ऑगस्टदरम्यान ही रक्कम जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.