पाण्याच्या टाकीच्या व्हिडिओवरून समाज कार्यकर्त्यावर गुन्हा

पाणीपुरवठा खात्याची पोलिसांत तक्रार : लोकांत संभ्रम निर्माण केल्याचा दावा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
01st September, 11:53 pm
पाण्याच्या टाकीच्या व्हिडिओवरून समाज कार्यकर्त्यावर गुन्हा

एकूण प्रकाराबद्दल माहिती देताना कार्यकारी अभियंता रश्मी शिरोडकर. सोबत सहाय्यक अभियंता योगेश सावंत व इतर.

वाळपई : सत्तरीतील केरी पंचायत क्षेत्रातील दोन एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील टाकीत गाळ व चिखलसदृश घाण साचल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी समाज कार्यकर्ते विश्वासराव राणे व अन्य दोघांविरुद्ध वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंता योगेश सावंत यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी राणे व अन्य दोन व्यक्तींनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता केरी येथील पाण्याच्या टाकीत प्रवेश करून चित्रीकरण केले. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या महत्त्वाच्या यंत्रणेत अनधिकृत प्रवेश केल्याने सार्वजनिक उपद्रव तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ३१ रोजी रात्री वाळपई पोलीस ठाण्यात क्र. ३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२५, २२३(ब), २९२, ३२९(३) सह ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
‍दरम्यान, सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याच्या डिचोली विभागाच्या कार्यकारी अभियंता रश्मी शिरोडकर यांनी मंगळवारी प्रकल्पाची पाहणी केली. पावसाळ्यात नदीचे पाणी गढूळ होत असल्याने टाकीत गाळ साचतो. सुमारे महिनाभरापूर्वी टाकीतील गाळ काढण्यात आला होता; मात्र पावसामुळे पुन्हा गाळ साचल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलशुद्धीकरण प्रकल्पात आवश्यक प्रक्रिया केल्यानंतरच नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असून, वितरित करण्यात येणारे पाणी शुद्ध असल्याचा दावा शिरोडकर यांनी केला.
कारवाई राजकीय हेतूने : राणे
विश्वासराव राणे यांनी मात्र या कारवाईमागे राजकीय प्रेरणा असल्याचा आरोप केला आहे. टाकीत साचलेल्या गाळामध्ये जंतू व कीटक असण्याची शक्यता व्यक्त करून त्यांनी पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे या प्रकरणावरून पाणीपुरवठा खाते आणि राणे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.            

हेही वाचा
सर्व पहा