..तो फोन कॉल आला आणि भारतीय अभियंता नेपाळमधील महापुरातून बचावला!

पत्नी, लहान मुलगी अजूनही बेपत्ता; दोघांच्याही वियोगाने बनला व्याकुळ : नेपाळमधील भीषण महापुरात अनेकांचे बळी गेले. अनेक संसार कायमचे उद्धवस्त झाले. नैसर्गीक आपत्तीने अनेकाच्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा कायमचा चुराडा केला. या अशा दुर्घटनेतही दैव बलवत्तर म्हणून काहीजण वाचले. त्याची माहिती आता पुढे येत आहे. ओडिशातील एका भारतीय अभियंत्याचा आणि त्याच्या सोबत असलेल्या दोघांचा जीव केवळ एका फोन कॉलमुळे थोडक्यात बचावला. मात्र, या महापुराने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले. पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी महापुरात वाहून गेली. अजून बेपत्ता आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
..तो फोन कॉल आला आणि भारतीय अभियंता नेपाळमधील महापुरातून बचावला!

काठमांडू : नेपाळमधील भीषण महापुरात अनेकांचे बळी गेले. अनेक संसार कायमचे उद्धवस्त झाले. नैसर्गीक आपत्तीने अनेकाच्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा कायमचा चुराडा केला. या अशा दुर्घटनेतही दैव बलवत्तर म्हणून काहीजण वाचले. त्याची माहिती आता पुढे येत आहे.  ओडिशातील एका भारतीय अभियंत्याचा आणि त्याच्या सोबत असलेल्या दोघांचा जीव केवळ एका फोन कॉलमुळे थोडक्यात बचावला. मात्र, या महापुराने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले. पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी महापुरात वाहून गेली.  अजून बेपत्ता आहेत. पत्नी आणि २ वर्षांच्या मुलीच्या वियोगाने मेकॅनिकल अभियंता गुन्नम जयकृष्ण व्याकुळ बनला आहे. काही तरी चमत्कार होणार आणि आपली पत्नी, मुलगी सापडणार अशी अपेक्षा त्याला आहे. 

कंपनीच्या फोन कॉलमुळे वाचले प्राण 

नेपाळमधील ‘अप्पर त्रिशुली’ जलविद्युत प्रकल्पावर कार्यरत असलेले ३७ वर्षीय मेकॅनिकल अभियंता गुन्नम जयकृष्ण यांच्यावर बेतलेले संकट आणि कंपनीच्या एका फोन कॉलमुळे त्यांचा जीव वाचला;  यासंदर्भात सर्वत्र चर्चा आहे. पत्नी साई बिंदू आणि दोन वर्षांची मुलगी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती असून, दोघीही अद्याप बेपत्ता आहेत.

जयकृष्ण यांचे क्वार्टर्स प्रकल्पाच्या ठिकाणापासून अवघ्या १.५ किलोमीटर अंतरावर होते. बुधवारी सकाळी कामावर गेले होते. सकाळी ९ वाजता नाश्त्यासाठी घरी परतण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, वर्कशॉपमध्ये हजेरी लावल्यानंतर त्यांना फोनवरून तातडीने बोगद्याची पाहणी करण्याचे आदेश कंपनीकडून मिळाले. त्यामुळे दोन सहकाऱ्यांसह बोगद्याच्या दिशेने रवाना झाले.

बोगद्यात पाहणी सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट

बोगद्यात पाहणी सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला आणि वेगाने पाणी आत शिरू लागले. जीव वाचवण्यासाठी जयकृष्ण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोगद्याच्या उंच भागाकडे धाव घेतली. हा भाग नदीपात्रापासून सुमारे ४० मीटर उंच असल्याने त्यांचा जीव वाचला.

मात्र, तेथून दिसणारे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. वर्कशॉप आणि वसाहतीतील अनेक घरे अक्षरशः नाहीशी झाली होती. सर्वत्र पाणी, चिखल आणि ढिगारे होते. मानवी जीवनाचा कुठेही मागमूस दिसत नव्हता असे जयकृष्ण यांनी सांगितले. 

३६ तास अन्न-पाण्याविना

जयकृष्ण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल ३६ तास खुल्या आकाशाखाली अन्न-पाण्याविना काढले. अखेर कंपनीने दुसऱ्या दिवशी दुपारी हेलिकॉप्टर पाठवून त्यांची सुटका केली. सध्या ते काठमांडूतील एका हॉटेलमध्ये असून, भारतात परतण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. या संपूर्ण काळात त्यांच्या मनात पत्नी आणि मुलीचीच चिंता होती. “माझी मुलगी आणि पत्नीचा विचार करून मी तासनतास रडत होतो. सर्व काही संपल्यासारखे वाटत होते,” असे जयकृष्ण यांनी सांगितले.

‘ती धावत येऊन मला मिठी मारायची... मी तिला कसा विसरू?’

पत्नी आणि मुलीच्या आठवणींनी जयकृष्ण भावूक झाले आहेत. दोन वर्षांची मुलगी घरी परतल्यावर धावत येऊन आपल्याला मिठी मारायची, हे आठवताना त्यांना अश्रू अनावर होतात. “ती माझ्या आयुष्यातील आनंद आहे. एखादा चमत्कार होईल आणि माझी मुलगी सापडेल, अशी अजूनही मला आशा आहे. मी घरी पोहोचलो की ती धावत येऊन माझ्या मिठीत शिरायची आणि मला घट्ट मिठी मारायची. मी तिला कसा विसरू शकेन?” असे जयकृष्ण यांनी भावनिक होत म्हटले.

‘पत्नीशिवाय माझ्या अस्तित्वाला अर्थ नाही’ : जयकृष्ण

जयकृष्ण आणि साई बिंदू यांचा २०२३ मध्ये विवाह झाला होता. पत्नीने वैवाहिक जीवनात कधीही कोणतीही तक्रार केली नाही, असे सांगताना जयकृष्ण यांनी आपला भावनिक आधारच हिरावला गेल्याचे सांगितले. “आमचे वैवाहिक जीवन आनंदी होते. माझ्या आयुष्यात असे संकट येईल, याची कधीच कल्पना केली नव्हती. तिच्याशिवाय माझ्या अस्तित्वाला काहीच अर्थ उरलेला नाही,” असे ते म्हणाले. पत्नी आणि मुलीशिवाय मूळ राज्यात ओडिशाला परतणे आपल्यासाठी अत्यंत वेदनादायी असेल, असेही त्यांनी सांगितले.

‘माझी बहीण आणि भाची परत मिळाव्यात, हीच प्रार्थना’

साई बिंदू यांचे भाऊ व्यंकटेश यांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “माझी बहीण आणि भाची मला परत मिळाव्यात, अशी मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करतो. देवाने त्यांची इतकी क्रूर परीक्षा का घेतली?” असा सवाल त्यांनी केला.

पत्नी, मुलगी सापडणार अशी आशा : जयकृष्ण 

पत्नी आणि मुलगी सुखरूप सापडतील, या आशेवर जयकृष्ण आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही  वाट पाहत आहेत. नेपाळमधील महापुराने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केले, त्यातील जयकृष्ण यांच्या कुटुंबाची कहाणी या आपत्तीची भयावहता अधिक तीव्रपणे समोर आणणारी ठरली आहे.

हेही वाचा
सर्व पहा