आमोणा येथील वेदांता प्रकल्पावरून १९ लाखांचे तांबे चोरीला

उत्तर प्रदेशातील एका संशयिताला अटक; आमोणा येथील वेदांता आयर्न अँड स्टील लिमिटेडच्या पिट आयर्न डिव्हिजन-२ मधील डीआय पाईप प्रकल्पाच्या ठिकाणाहून सुमारे १९.१३ लाख रुपये किमतीचे तांब्याचे बार चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत उत्तर प्रदेशातील एका संशयिताला अटक केली आहे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 mins ago
आमोणा येथील वेदांता प्रकल्पावरून १९ लाखांचे तांबे चोरीला

डिचोली : आमोणा येथील वेदांता आयर्न अँड स्टील लिमिटेडच्या पिट आयर्न डिव्हिजन-२ मधील डीआय पाईप प्रकल्पाच्या ठिकाणाहून सुमारे १९.१३ लाख रुपये किमतीचे तांब्याचे बार चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत उत्तर प्रदेशातील एका संशयिताला अटक केली आहे.

वेदांता आयर्न अँड स्टील लिमिटेडचे तरुण कुमार जैन यांनी गेल्या महिन्याच्या ३१ तारखेला  सायंकाळी ४.५५ वाजता डिचोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार, १२ मार्च ते १६ जुलै २०२६ या कालावधीत आमोणा येथील डीआय पाईप प्रकल्पाच्या ठिकाणी चोरीचा प्रकार घडला.

अज्ञात व्यक्तींनी प्रकल्पाच्या ठिकाणी साठवून ठेवलेले २५.८ किलो वजनाचे ३७ तांब्याचे बार आणि ८०.६ किलो वजनाचे ३ तांब्याचे बार लंपास केले. चोरीला गेलेल्या तांब्याची एकूण किंमत अंदाजे १९.१३ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या चोरीमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून विविध स्रोतांकडून माहिती संकलित केली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उदैभान राम नगन (वय २९, रा. उमरपूर अकबरपूर, आंबेडकरनगर, उत्तर प्रदेश) याला संशयित म्हणून अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास डिचोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमरनाथ पाळणी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. चोरीतील तांब्याचे बार तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.