मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील आश्वासनानंतर ५ पोलीसांवर कारवाई

खात्याअंतर्गत चौकशी सुरू; मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभा अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार आज बुधवारी पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची, बदलीची कारवाई करण्यात आली. आणि खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
02nd September, 11:40 am
मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील आश्वासनानंतर ५ पोलीसांवर कारवाई

पणजी : मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभा अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार आज बुधवारी पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची, बदलीची कारवाई करण्यात आली. आणि खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आमदार कार्लुस फेरेरा यांनी काल विधानसभेत काही पोलिसांचे गैरवर्तन, भ्रष्टाचार व वरकमाईचा मुद्दा उपस्थित करून सरकारला घेरले होते. त्याचबरोबर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्यांत मुख्य कारकून मुकुंद मेणकुरेकर/लामगांवकर, कारकून प्रताप सावंत, पोलीस शिपाई गौरेश गावस, सुमेश मांद्रेकर, उपनिरीक्षक विराज सावंत यांचा समावेश आहे. 


मुख्य लिपिक मुकुंद लामगावकर याच्यावर एलआयसी एजंट असलेल्या पत्नीच्या मार्फत इतरांवर एलआयसी पॉलिसी घेण्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली. 

एलडीसी प्रताप सावंत याच्यावर  होमगार्ड जवानांकडून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत पैसे घेतल्याच्या आरोपावरून कारवाई करण्यात आली. 

पोलीस कॉन्स्टेबल गौरेश गावस याला ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत अधिक मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले. त्याच्याविरोधातील आणखी एका तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) चौकशी सुरू आहे.

पोलीस कॉन्स्टेबल सुमेश मांद्रेकर याच्याविरुद्ध कोलवाळ पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या एनडीपीएस कायद्याच्या कलमांनुसार झालेल्या गुन्ह्यावरून निलंबित करण्यात आले आहे.   कॉन्स्टेबलविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पर्वरी पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक विराज सावंत याची हॉटेल कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून जीआरपी आल्तीनो येथे बदली करण्यात आली आहे. आणि खात्याअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा