पणजी : गोवा लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनुसार (जीपीएससी) शिक्षण खात्याने राज्यातील ७७ सहाय्यक शिक्षकांना एडीईआय/ग्रेड १ शिक्षक पदावर बढती दिली आहे. यासंदर्भातील बढतीचा आदेश शिक्षण खत्याने आज मंगळवारी जारी केला.
शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, बढती देण्यात आलेल्या शिक्षकांना आदेश जारी झाल्यानंतर सात दिवसांत बढती स्वीकारल्याचे किंवा नाकारल्याचे पत्र द्यावे लागणार आहे. सात दिवसांत स्वीकृतीचे पत्र न दिल्यास बढती नाकारल्याचे समजले जाणार. त्यानंतर एक वर्षपर्यंत किंवा नव्या जागा तयार होईपर्यंत बढती मिळणार नसल्याचे शिक्षण खात्यातर्फे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


