पणजी: गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष उदयसिंह रावराणे यांच्या निवडीला आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. १२ ऑक्टोबर रोजी हे प्रकरण सुनावणीस येणार असल्याची माहिती काशिनाथ शेट्ये यांनी दिली.
उदयसिंह रावराणे यांची गोवा लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करताना प्रक्रिया व्यवस्थित करण्यात आली नसल्याने ही याचिका दाखल करण्यात आली. निवड प्रक्रियेसाठी वर्तमानपत्रात जाहीरात देण्यात आली नव्हती. त्यांच्याकडून थेट अर्ज मागवून अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गोव्यात तसेच गोव्याबाहेर त्यांच्यापेक्षाही जास्त पात्र उमेदवार मिळू शकले असते. पात्र उमेदवारांना संधी मिळावी म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होणार असल्याचे काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले.


