पर्वरी : पर्वरी येथे ‘निओ मॅजिस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गोवा पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. संशयितांचा ठावठिकाणा लागला आहे की नाही, ते सध्या सांगता येणार नसल्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.
गोळीबारप्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत असून, घटनेमागील आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध अंगांनी तपास सुरू आहे. तपासातून महत्त्वाचे धागेदोरे हाती येत असून, आरोपींना लवकरच गजाआड करण्यात पोलीस यशस्वी ठरतील, असा विश्वास आलोक कुमार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गोळीबार प्रकरणाचा तपास करण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक मुंबईत तसेच अन्य ठिकाणीही रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेनंतर पर्वरी परिसरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.
दोन दिवसांमागेच पर्वरी येथे ‘निओ मॅजिस्टिक’मधून बाहेर पडताना श्रीनिवास नायक यांच्यावर वाहनात बसण्याच्या प्रयत्नात असताना दोघांनी गोळीबार केला होता. मात्र, त्यातून ते बचावले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकांनीही गोळीबार केलेल्यांच्या दिशेने गोळीबार केला होता.
मात्र, यात कुणीही जखमी झाले नव्हते. गोळीबार केल्यानंतर दोघेही पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. याप्रकरणाचा सध्या गोवा पोलीस तपास करीत आहेत. सध्या हे प्रकरण तपासासाठी गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आले आहे.


