चतुर्थीत घुमणार निरंकालमधील ‘सर्वोत्तम’ घुमटांचा नाद

सर्वोत्तम वेळगेकर यांच्या घुमटांना पसंती : शिरवईतील घुमटांची कमतरता काढताहेत भरून

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
33 mins ago
चतुर्थीत घुमणार निरंकालमधील ‘सर्वोत्तम’ घुमटांचा नाद

फोंडा : गणेश चतुर्थीच्या आरतीसाठी प्रसिद्ध असलेली शिरवई-केपे येथील पारंपरिक घुमट वाद्ये सध्या मिळणे कठीण झाले असले, तरी फोंड्यातील बेतोडा पंचायत क्षेत्रातील सातेरीमळ-निरंकाल येथे ती सहज उपलब्ध होत आहेत. येथील नाना या नावाने परिचित असलेले सर्वोत्तम वेळगेकर गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ही वाद्ये उपलब्ध करून देत असल्याने परिसरातील वादक कलाकारांची मोठी सोय झाली आहे.

राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून शिरवई-केपे येथे तयार केलेली घुमट वाद्ये प्रसिद्ध असून, बहुतांश वादक याच वाद्यांना पसंती देतात. पूर्वी कुंभारवाडा-निरंकाल, उधळशे-साकोर्डा, अडवई-सत्तरी व अन्य भागांतही घुमट तयार केले जात होते; मात्र कालांतराने ही प्रक्रिया बंद पडली. सध्या केवळ शिरवई येथे एकच व्यक्ती घुमट तयार करून विविध ठिकाणी पुरवठा करत आहे. त्यामुळे दरवर्षी निरंकाल येथून १५० पेक्षा अधिक घुमटांची विक्री होते.

आरती स्पर्धांच्या सरावासाठी मागणी

राज्यात गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली असून आकर्षक सजावट, रंगकामासह विविध गावांतील युवकांनी घुमट आरतीचे प्रशिक्षण आणि स्पर्धांच्या तयारीला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात घुमट वादनाची समृद्ध परंपरा असून, वादक कलाकारांना चांगल्या दर्जाची वाद्ये मिळावीत यासाठी कित्येक वर्षांपासून ही सोय उपलब्ध केली जात आहे. दर्जेदार घुमट मिळवण्यासाठी दरवर्षी राज्याच्या विविध भागांतून वादक निरंकाल येथे येतात.

विविध भागांतून कलाकारांची गर्दी

कित्येक युवकांना शिरवई-केपे येथे तयार केलेलीच घुमट वाद्ये हवी असतात, त्यामुळे आपण दरवर्षी ती खरेदी करून लोकांना उपलब्ध करून देतो. मडकई, वाळपई, मोले, साकोर्डा, फोंडा, उसगाव, साखळी व इतर भागांतून युवक ही वाद्ये खरेदी करण्यासाठी येथे येतात, असे नाना ऊर्फ सर्वोत्तम वेळगेकर यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा