गोव्यात वाढत्या अपघातांवरून विधानसभेत चिंता; एआय कॅमेऱ्यांमुळे अपघात घटल्याचा वाहतूकमंत्र्यांचा दावा

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
45 mins ago
गोव्यात वाढत्या अपघातांवरून विधानसभेत चिंता; एआय कॅमेऱ्यांमुळे अपघात घटल्याचा वाहतूकमंत्र्यांचा दावा

पणजी: गोव्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या भीषण रस्ते अपघातांच्या मालिकेवर आणि त्यात निष्पाप नागरिकांचा जात असलेल्या बळींवरून काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. नुकत्याच घडलेल्या विविध अपघातांचे दाखले देत त्यांनी राज्यातील वाहतूक सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणेकडून उचलल्या जाणाऱ्या पावलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर उत्तर देताना, राज्यात बसवण्यात आलेल्या एआय ट्रॅफिक कॅमेऱ्यांमुळे वेगावर नियंत्रण आले असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे, असा दावा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केला.

सभागृहात बोलताना आमदार फेरेरा यांनी ३० ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास फोंडा येथील केटीसी उड्डाणपुलावरून कार खाली कोसळल्याच्या घटनेचा उल्लेख केला. तसेच बागा मुख्य रस्त्यावर टॅक्सी आणि स्कूटरच्या धडकेत चंदीगड येथील ५५ वर्षीय पर्यटक संजय जुनिजा यांचा जागीच झालेला मृत्यू आणि त्यांच्या मुलाला झालेली गंभीर दुखापत यावर त्यांनी लक्ष वेधले. याशिवाय कुडचडे-केपे मार्गावर एका २५ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनाही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

राज्यातील अपघातांच्या आकडेवारीचा हवाला देत फेरेरा यांनी सांगितले की, गोव्यात २०२१ मध्ये ३,१०० अपघातांत २५३ जणांचा, तर २०२३ मध्ये २,८३२ अपघातांत २५६ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, २०२६ च्या पहिल्या आठ महिन्यांतच अपघातांचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे. या कालावधीत १,३२४ अपघातांची नोंद झाली असून तब्बल १४२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, ज्यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी २०१८ मधील केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार दुचाकींचा ताशी ८० किमी वाढलेला वेग मर्यादित करावा, गर्दीच्या ठिकाणी व धोकादायक वळणांवर कडक वेगमर्यादा लागू करावी आणि एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अपघातांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार फेरेरा यांच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देताना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले की, गोव्यात आधुनिक एआय ट्रॅफिक कॅमेरे बसवल्यानंतर वाहनांच्या वेगावर आपोआप नियंत्रण आले असून अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. कॅमेरे आणि चलनाची भीती असल्यामुळे वाहनचालक स्वतःहून वेग नियंत्रित करत असून रस्त्यांवरील शिस्त सुधारली आहे. दंडाची रक्कम वसूल करणे हा सरकारचा हेतू नसून, नागरिकांनी वेगमर्यादा पाळून रस्ते सुरक्षित ठेवावेत हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा