म्हापसा : ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या खूनी हल्याला तीन दिव उलटूनही पर्वरी पोलिसांच्या हाती अद्याप कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही. या पार्श्वभूमीवर सरकारने हे बहुचर्चित प्रकरण आता गुन्हा शाखेकडे वर्ग केले आहे. या गोळीबार प्रकरणात चार-पाच हल्लेखोरांच्या टोळीचा समावेश आहे व हे सर्वजण त्यादिवशी घटनास्थळीच असल्याचे प्राथमिक पोलीस चौकशीत आढळून आले आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असले तरीही पोलिसांच्या हाती अजून ठोस असे काहीच लागलेले नाही.
शुक्रवारी २८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४७च्या सुमारास हॉटेल निओ मॅजेस्टिकच्या मागील (एक्सीट) प्रवेशद्वारावर ही गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी मॅजेस्टिक प्राईड ग्रुपचे संचालक श्रीनिवास नायक (रा. दोनापावला) यांच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात दोघा हल्लेखोरांविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२५ व सहकलम ३(५) तसेच बंदूक कायदा कलम ३ व सहकलम २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुपारी हा गुन्हा पर्वरी पोलिसांनी गुन्हा शाखेकडे हस्तांतरीत केला आहे.
घटनेच्या दिवशी फिर्यादी श्रीनिवास नायक हे हॉटेल निओ मॅजेस्टिकमधून रोजच्या प्रमाणे घरी जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा त्यांच्या कारगाडीच्या मागे दबा धरून बसलेल्या हल्लेखांरांनी त्यांच्यावर थेट पिस्तूलाचे तीन राऊंड फायर केले. त्यानंतर नायक यांच्या अंगरक्षकांनी प्रतिउत्तर देत तीन गोळ्या झाडल्या होत्या. हल्लेखोरांनी या गोळ्या ९ एमएमच्या पिस्तूलातून फायर केल्याचे तपासातून आढळून आले होते.
हल्ल्यानंतर संशयित आरोपी हे महामार्ग ओलांडून पसार होण्यास यशस्वी ठरले होते. या हल्ल्यासाठी संशयितांनी एका पल्सर मोटारसायकचा वापर केला होता. मात्र पर्वरी येथे वाटेतच ही मोटारसायकल टाकून त्यांनी पलायन केले.
या हल्ल्यावेळी घटनास्थळी हल्लेखोरांचे अजून दोन ते तीन साथीदार हजर होते. हल्ल्यानंतर त्यांनीच मुख्य हल्लेखोरांना पळून जाण्यास मदत केल्याचे तपासातून उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सर्वांचे चेहरे बंदीस्त झाले आहेत.
मात्र हे हल्लेखोर नेमके कुठे गायब झाले याचा सुगावा लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या हल्ल्याच्या अनुषंगाने वेगवेगळी पोलीस पथके मुंबईसह शेजारील राज्यांमध्ये पाठवण्यात आली आहेत. शिवाय संपूर्ण गोव्यात पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे. आंतरराज्य बसेस, सीमा तपासणी नाके, रेल्वे स्थानकांवरील प्रवासी वर्गावर देखरेख ठेवण्यात आली आहे.


