स्वच्छता आणि रुग्णांच्या उपचाराबाबत गोमेकॉत तडजोड नाही: विश्वजीत राणे

गोमेकॉतील औषध तुटवडा फेटाळत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी रुग्ण सेवेतील दिरंगाई व अस्वच्छतेवर कडक इशारा दिला. दर १५ दिवसांनी आढावा घेण्याचे आणि रात्री सरप्राइज व्हिजिट देण्याचे त्यांनी जाहीर केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
स्वच्छता आणि रुग्णांच्या उपचाराबाबत गोमेकॉत तडजोड नाही: विश्वजीत राणे

पणजी: गोमेकॉ तसेच आरोग्य खात्यांतर्गत येणाऱ्या विविध रुग्णालयांच्या कामकाजातील त्रुटी, स्वच्छता आणि प्रशासकीय शिस्तीच्या मुद्द्यावरून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. रुग्णालयीन सोयीसुविधा, पेस्ट कंट्रोल आणि रुग्ण सेवेत आवश्यक त्या सर्व सुधारणा प्राधान्याने केल्या जात असल्याचे स्पष्ट करत, निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सडेतोड इशारा त्यांनी दिला आहे.

दुपारी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी गोमेकॉतील सद्यःस्थितीचा सविस्तर आढावा मांडला. गोमेकॉमध्ये औषधांचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगत त्यांनी तुटवड्याचे वृत्त फेटाळून लावले. रुग्णालयात सर्व आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच स्वच्छता, पेस्ट कंट्रोल आणि रुग्णांची देखभाल यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाला दर १५ दिवसांनी नियमित आढावा घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

कॅज्युअल्टी विभागात रुग्णांना वेळेवर उपचार न मिळता २ ते ३ तास उपचारांशिवाय पडून राहावे लागल्याच्या घटनांची गंभीर दखल आरोग्यमंत्र्यांनी घेतली. रुग्णांना उपचारासाठी ताटकळत राहावे लागणे खपवून घेतले जाणार नाही. वैद्यकीय अधीक्षक, डीन आणि विभागप्रमुखांनी (HODs) नियमित फेऱ्या मारून रुग्णांच्या समस्यांचे जागेवरच निवारण करावे, असे ते म्हणाले. रुग्णालयीन व्यवस्थेत शिस्त आणण्याचा प्रयत्न गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी करताना होणाऱ्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, "मी जेव्हा जेव्हा कामात शिस्त आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माध्यमं माझ्यावरच टीका करतात. परंतु, जीएमसीसारख्या मोठ्या संस्थेत काम करताना जनतेला योग्य सेवा मिळावी ही सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे.

रुग्णालयातील स्वच्छता आणि सेवांचा दर्जा तपासण्यासाठी आपण स्वतः पूर्वीप्रमाणेच रात्री १, २ किंवा ४ वाजता रुग्णालयात अचानक सरप्राइज व्हिजिट देऊन पाहणी करणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले. दरम्यान, गोमेकॉ रुग्णालयात रुग्णांना उंदीर चावल्याच्या कथित वृत्तांनंतर डीन यांना त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यावर पुढील भाष्य केले जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा