पणजी : ऐन सणासुदीच्या दिवसांत वाढती महागाई लोकांना त्रस्त करू लागली आहे. गोमंतकीयांच्या जेवणातील मुख्य भाग असलेला नारळही महाग झाल्याने गोमंतकीयांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा फलोत्पादन महामंडळाकडून ग्राहकांना ‘ना नफा- ना तोटा’ तत्त्वावर नारळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे गोमंतकीयांना काहीप्रमाणात दिलासा मिळणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ही गोवा फलोत्पादन महामंडळातर्फे ही व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी दिली. फलोत्पादन महामंडळ ‘ना नफा- ना तोटा’ तत्त्वावर नारळ उपलब्ध करून देणार व महामंडळाच्या विक्री केंद्रांवर नारळ उपलब्ध असणार असल्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
गणेश चतुर्थीच्या काळात नारळाला मोठी मागणी असते. माटोळीला बांधण्यासाठी, पुजेसाठी, करंज्या, पातोळ्या व तत्सम पदार्थ तयार करण्यासाठी तसेच जेवणासाठीही मोठ्या प्रमाणात नारळ लागत असतात.
ही गरज लक्षात घेऊन सणाच्या दिवसांत ग्राहकांना योग्य दरात नारळ मिळावा, यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. बाजारातील वाढत्या किमतींचा फटका ग्राहकांना बसू नये, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. महामंडळाच्या माध्यमातून नारळाची विक्री नफा न कमावता आणि तोटा ही सहन न करता केली जाणार असल्याने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.


