गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
मुरगाव तालुक्यातील हेडलॅण्ड सडा येथील प्रसिद्ध ‘मुरगावचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची शेड ३० सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी जमीनदोस्त केली जाईल, अशी हमी मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने कारवाई करण्यासाठी मुदत देत पुढील सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.
या प्रकरणी मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) याचिका दाखल केली होती. शेड बेकायदेशीर असल्याचे समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२५ रोजी शेड पाडण्याचा आदेश दिला होता. कार्यवाहीसाठी संबंधित प्रशासनाला सहा आठवड्यांची मुदत दिली होती. २० ऑक्टोबर २०२५ रोजी सदर मुदत संपली. कार्यवाही न झाल्यामुळे एमपीएने नोव्हेंबर २०२५ मध्ये अवमान याचिका दाखल केली. त्यात पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांना प्रतिवादी केले. मागील सुनावणीनुसार, शेडवर २७ जुलै रोजी कारवाई होणार होती. मात्र ती कारवाईही झाली नाही. सदर कारवाई २८ आॅगस्ट रोजी ठेवल्याची माहिती दिली होती. त्यावेळी न्यायालयाने नाराजी व्यक्त करत शेडचा वीजपुरवठा तीन दिवसांत बंद करण्याचा आदेश वीज कार्यकारी अभियंत्यांना दिला. उपजिल्हाधिकाऱ्यांना २८ आॅगस्ट रोजी कारवाईचे आदेश दिले होते.
मंगळवार, १ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली असता, २८ आॅगस्ट रोजी कारवाई करण्यास सुरू केली होती. त्याच दरम्यान मुख्याधिकारी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. नागरिकांनी कारवाई अडवली तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यामुळे कारवाई स्थगित केल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. मुख्याधिकारी नाईक यांनी ३० सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी शेडवर कारवाई करण्याची हमी दिली.


