गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
मागील काही वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडून अन्य देशांचे नागरिकत्व स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे. १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२६ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत गोव्यातील ६,९६० जणांनी त्यांचा पासपोर्ट सरेंडर करून भारतीय नागरिकत्व सोडले आहे. याचाच अर्थ वर्षाला सरासरी १,९८९, महिन्याला सरासरी १६५, तर दिवसाला सरासरी ५ हून अधिक गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे.
याबाबत आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरानुसार, केंद्रीय संस्था एफआरपीओच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये गोव्यातील २,०९४ व्यक्तींनी पासपोर्ट सरेंडर केला होता. २०२४ मध्ये ही संख्या वाढून २,२९५ इतकी झाली. असे असले तरी २०२५ मध्ये पासपोर्ट सोडणाऱ्या गोमंतकीय व्यक्तींची संख्या कमी होऊन १,७९७ इतकी झाली. तर १ जानेवारी ते ३० जून २०२६ दरम्यान ७७४ जणांनी पासपोर्ट सरेंडर केला आहे. पासपोर्ट सरेंडर केलेल्या व्यक्ती कोणत्या मतदारसंघांतील आणि तालुक्यांतील होत्या याची माहिती एफआरपीओकडे उपलब्ध नसल्याचे उत्तरात म्हटले आहे.
याआधी विधानसभा सभागृहात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यात पुरेशा रोजगार संधी नसल्याने गोमंतकीय आपला पासपोर्ट सरेंडर करून अन्य देशांचे नागरिकत्व स्वीकारत असल्याचा आरोप केला होता. राष्ट्रीय सर्वेक्षण पीएलएफएसनुसार, गोव्याचा बेरोजगारी दर देशात सर्वाधिक असल्याचे म्हटले होते. तसेच हा दर राष्ट्रीय बेरोजगारी दरापेक्षा दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारने राज्यात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध केल्याचे स्पष्ट केले होते. डबल इंजिन सरकारने केलेल्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन नागरिकत्व सोडलेल्या दोन गोमंतकीय व्यक्ती पुन्हा भारतीय नागरिकत्व स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान २३,४१० गोमंतकीयांनी आपला पासपोर्ट सरेंडर करून भारतीय नागरिकत्व सोडले होते. याचाच अर्थ वरील काळात वर्षाला २,६०१ तर महिन्याला २१६ म्हणजेच दिवसाला ७ हून अधिक जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले होते. २०१६ मध्ये सर्वाधिक ४,१२१ जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले होते. २०१५ मध्ये ३,९४०, २०१७ मध्ये ३,६२३, २०१८ मध्ये ३,५१६, २०१९ मध्ये २,९५८, २०२० मध्ये ९७६, तर २०२१ मध्ये ९५४ जणांनी पासपोर्ट सरेंडर करून भारतीय नागरिकत्व सोडले होते.
पोर्तुगीज नागरिकत्सव स्वीकारणाऱ्यांची संख्या अधिक
उपलब्ध माहितीनुसार, २०२१ ते २०२५ दरम्यान भारतीय पासपोर्ट सरेंडर केलेल्या ८,३७० जणांनी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले होते. १८ जणांनी यूके, १२ जणांनी कॅनडा, ९ जणांनी यूएसए, ३ जणांनी रशियाचे नागरिकत्व स्वीकारले होते.


