ममता बॅनर्जी यांच्या भाचीचा बीरभूम येथील निवासस्थानी संशयास्पद मृत्यू

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
01st September, 05:01 pm
ममता बॅनर्जी यांच्या भाचीचा बीरभूम येथील निवासस्थानी संशयास्पद मृत्यू

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भाचीचा बीरभूम जिल्ह्यातील कुसुमबा गावात राहत्या घरी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. दृष्टी मुखर्जी (२८) असे मृत तरुणीचे नाव असून, त्या तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते आणि ममता बॅनर्जी यांचे चुलत भाऊ निहार मुखर्जी यांच्या कन्या होत्या. या घटनेमुळे पश्चिम बंगालच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.



पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत दृष्टी मुखर्जी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक पाहणीनंतर पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदन अहवाल आणि तपासाचे निष्कर्ष आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


दृष्टी मुखर्जी यापूर्वी बोलपूर येथील एका उच्च प्राथमिक शाळेत बिगर-शिक्षक कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. मात्र, पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोग भरती प्रकरणातील अनियमिततेमुळे कोलकाता उच्च न्यायालयाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या सुमारे २६,००० नियुक्त्यांच्या यादीत त्यांचेही नाव समाविष्ट होते. नोकरी गमावल्यामुळे उद्भवलेला मानसिक तणाव, आरोग्यविषयक समस्या आणि कौटुंबिक पटलावर सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रक्रियेमुळे त्या गेल्या काही वर्षांपासून नैराश्याचा सामना करत होत्या, असे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे. पोलीस या सर्व घटकांचा विचार करून सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा