पणजी : तिळारी धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यास पर्वरीसह संपूर्ण बार्देश तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी गणेश चतुर्थी आणि दसरा सणांच्या पार्श्वभूमीवर तिळारीचे पाणी बंद करू नये, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली आहे.
तिळारीच्या पाण्यावर बार्देश तालुक्यातील अनेक भागांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः सणासुदीच्या काळात पाण्याची मागणी वाढत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता खवटे यांनी व्यक्त केली.
गणेश चतुर्थी आणि दसरा हे महत्त्वाचे सण जवळ आले आहेत. या काळात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळणे आवश्यक असल्याने तिळारीचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेऊ नये. तसेच पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


