श्री सप्तकोटेश्वर, कोटीतीर्थ जीर्णोद्धार समितीतर्फे ४ सप्टेंबरला उदक शांती, गंगापूजन

पुरातत्व खाते आणि श्री सप्तकोटेश्वर, कोटीतीर्थ जीर्णोद्धार समितीतर्फे ४ सप्टेंबर रोजी सप्तकोटेश्वर मंदिर तसेच कोटीतीर्थ परिसरात उदक शांती आणि गंगापूजनाचे आयोजन केले आहे. यावेळी जाहीर सभा आणि जुन्या अवशेषांचे प्रदर्शन देखील होणार आहे. समितीचे समन्वयक भूषण भावे यांनी ही माहिती दिली.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
श्री सप्तकोटेश्वर, कोटीतीर्थ जीर्णोद्धार समितीतर्फे ४ सप्टेंबरला उदक शांती, गंगापूजन

पणजी : पुरातत्व खाते आणि श्री सप्तकोटेश्वर, कोटीतीर्थ जीर्णोद्धार समितीतर्फे ४ सप्टेंबर रोजी  सप्तकोटेश्वर मंदिर तसेच कोटीतीर्थ परिसरात उदक शांती आणि गंगापूजनाचे आयोजन केले आहे. यावेळी जाहीर सभा आणि जुन्या अवशेषांचे प्रदर्शन देखील होणार आहे. समितीचे समन्वयक भूषण भावे यांनी ही माहिती दिली. 

बुधवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माहिती आणि प्रसारण खात्याचे संचालक अबिर हेदे, पुरातत्व खात्याचे संचालक डॉ. निलेश फळदेसाई, पुराभिलेख खात्याचे संचालक बालाजी शेणवी उपस्थित होते. 

कदंब राजांचे कुलदैवत : भावे

भावे यांनी सांगितले की, कदंब काळात श्री सप्तकोटेश्वर मंदिर सध्या कोटीतीर्थ तळी असणाऱ्या परिसरात होते. हे कदंब राजांचे कुलदैवत होते. येथे दर गोकुळ अष्टमीला मोठी यात्रा होत होती. पोर्तुगीज प्रवाशांनी या यात्रेचे वर्णन करून ठेवले आहे. बहामनी काळात येथील देवाची मूर्ती फोडण्यात आली. यानंतर विजयनगर काळात मूर्ती पुन्हा बांधून ती सध्याच्या डिचोली, नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर परिसरात हलवण्यात आली. यानंतर पोर्तुगीज काळात कोटीतीर्थ परिसरातील मंदिर पूर्णपणे उध्वस्त करण्यात आले. 

ते म्हणाले, गोवा सरकार तसेच समितीच्या वतीने या भागात उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात समितीला १०० हून अधिक तर पुरातत्व खात्याला ४० प्राचीन अवशेष सापडले होते. यावरून ते मंदिर पूर्वी येथेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कदंब काळात येथे भरणाऱ्या मोठ्या यात्रेची आठवण म्हणून आम्ही गोकुळाष्टमी रोजी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी येथे सापडलेल्या अवशेषांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. यावेळी धार्मिक विधी १० ते ११ दरम्यान केले जातील. तर जाहीर सभा ११ वाजता सुरू होणार आहे.

कार्यक्रम स्थळी लोकांना जाण्यायेण्याची सुविधा 

बालाजी शेणवी यांनी सांगितले की,  कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम स्थळी लोकांना जाण्यायेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी कदंब बस स्थानक तसेच दिवाडी फेरी धक्का ते कोटीतीर्थ दरम्यान बस उपलब्ध करून दिल्या जातील. या दिवशी दिवाडी आणि नार्वे दरम्यान फेरीबोटी वाढवण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. दिवाडी येथे जाण्यासाठी जुने गोवा आणि रायबंदर येथून विशेष फेरी सुरू केली जाईल.  भाविकांना पारंपारिक वाटेने चालत येण्याची सुविधा देखील उपलब्ध केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा