माणगाव : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढू लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. माणगाव शहरासह इंदापूर, माणगाव आणि लोणेरेदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
इंदापूर ते माणगाव आणि लोणेरे असा सुमारे २० किलोमीटरचा मार्ग पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल दोन तासांचा वेळ लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावरील वाहतुकीवर मोठा ताण आला आहे.
माणगाव हे श्रीवर्धन, म्हसळा, दापोली, मंडणगड आणि महाडकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीचा ताण अधिक जाणवत आहे. त्यातच बायपास आणि उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर झाली आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ४०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड २४ तास तैनात करण्यात आले आहेत.
वाहन बिघाडामुळे वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी क्रेन आणि हायड्रा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस महामार्गावरील वाहतूक प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.


