नेपाळ महापुराची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी; बेपत्ता नातेवाईकांच्या प्रतिकात्मक अंत्यविधीला सुरुवात

कुशाच्या गवतापासून केले जातात प्रतिकात्मक मृतदेह; नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण भोटेकोशी महापुराने (Nepal flood tragedy) शेकडो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. महापुराला आठ दिवस उलटूनही हजारो जण बेपत्ता असून, त्यांच्या जिवंत सापडण्याची आशा आता मावळू लागली आहे. त्यामुळे काही कुटुंबांनी बेपत्ता नातेवाईकांच्या प्रतिकात्मक अंत्यविधीला सुरुवात केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
03rd September, 03:22 pm
नेपाळ महापुराची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी; बेपत्ता नातेवाईकांच्या प्रतिकात्मक अंत्यविधीला सुरुवात

काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण भोटेकोशी महापुराने (Nepal flood tragedy) शेकडो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. महापुराला आठ दिवस उलटूनही हजारो जण बेपत्ता असून, त्यांच्या जिवंत सापडण्याची आशा आता मावळू लागली आहे. त्यामुळे काही कुटुंबांनी बेपत्ता नातेवाईकांच्या प्रतिकात्मक अंत्यविधीला सुरुवात केली आहे.

रसुवा जिल्ह्यातील पाहारेबेसी गावात बेपत्ता नातेवाईकांची आठ दिवसांपासून कोणतीही माहिती न मिळाल्याने काही कुटुंबांनी अंतिम संस्काराची तयारी सुरू केली आहे. मात्र, या कुटुंबांसमोर शोकविधी पार पाडण्यासाठीही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापुरात घरे उद्ध्वस्त झाल्याने राहण्यासाठी जागा नाही, तर अंत्यविधीचे धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पुरोहितांचीही कमतरता भासत आहे.

उत्तरगया ग्रामीण पालिकेचे अध्यक्ष माधवप्रसाद आर्याल यांनी सांगितले की, बेपत्ता व्यक्ती सापडण्याची शक्यता कमी असल्याचे वाटत असलेल्या कुटुंबांनी अंतिम विधीची प्रक्रिया सुरू केली आहे. गावातील परिस्थिती अत्यंत भीषण असून, जुन्या वस्तीचे जवळपास काहीच अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत.

पाहारेबेसीतील २० हून अधिक कुटुंबे शोकविधीसाठी काठमांडू आणि इतर ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत. आणखी काही कुटुंबेही गाव सोडण्याच्या तयारीत आहेत.

कुशाच्या गवतापासून प्रतिकात्मक मृतदेह

महापुरग्रस्त भागात बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह सापडत नसल्याने काही कुटुंबे कुशाच्या गवतापासून प्रतिकात्मक पुतळे तयार करून अंत्यविधीचे धार्मिक विधी पार पाडत आहेत. मृतदेह मिळण्याची शक्यता कमी होत असल्याने कुटुंबीयांसमोर हा कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

काठमांडूमधील शोकविधीसाठी असलेल्या विविध ‘किरियापुत्री भवनां’मध्येही मोठी गर्दी झाली आहे. रुद्रमती महादेव मंदिरातील किरियापुत्री भवनात रसुवा महापुरात तीन ते पाच सदस्य गमावलेले आठ गट सध्या राहत आहेत. गुप्तेश्वर महादेव मंदिरातील सर्व आठ खोल्याही भरल्या असून, व्यवस्थापनाने तंबू उभारून अतिरिक्त सहा खोल्यांची व्यवस्था केली आहे.

१३ दिवसांच्या शोकविधीसाठी जागेची कमतरता 

हिंदू धर्मातील १३ दिवसांच्या शोकविधीसाठी किरियापुत्री भवनात कुटुंबीय वास्तव्य करतात. मात्र, सध्या जागेची कमतरता असल्याने अनेक कुटुंबांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

घर नाही, निवारा नाही; अंत्यविधीसाठीही संघर्ष

महापुराने केवळ माणसे हिरावून घेतली नाहीत, तर हजारो कुटुंबांची घरेही वाहून नेली. त्यामुळे काही कुटुंबांना मृतदेह सापडल्यानंतर अंत्यसंस्कार करूनही शोककाळ पाळण्यासाठी काठमांडूला यावे लागत आहे. गावात राहण्यासाठी घरच उरलेले नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

शोकविधीच्या काळात आवश्यक असलेल्या स्वयंपाकाच्या गॅसचीही कमतरता भासत आहे. काही कुटुंबांनी मृतदेह मिळण्याची आणि त्यांची ओळख पटण्याची शक्यता कमी झाल्याने प्रतिकात्मक अंत्यविधीचा मार्ग स्वीकारला आहे.

७ हजार घरे गेली वाहून 

महापुरात ७ हजारांहून अधिक घरे वाहून गेली आहेत. अनेक उरलेली घरेही राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. गुरुवारी सकाळपर्यंत महापुरात मृत्यू पावलेल्या १,२०० हून अधिक व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत, तर हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत.

कुटुंबीयांसोर दुहेरी संकट 

उत्तर आणि मध्य नेपाळला हादरवून सोडणाऱ्या या महापुरामुळे कुटुंबीयांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. आप्तस्वकीय गमावल्याचे दुःख आणि शोक व्यक्त करण्यासाठी स्वतःचे घरही नसल्याची असहायता.. अनेक उरलेली घरेही राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. गुरुवारी सकाळपर्यंत महापुरात मृत्यू पावलेल्या १,२०० हून अधिक व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत, तर हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत.


.

हेही वाचा
सर्व पहा