सुयशच्या शतकानंतरही गोवा संकटात

दिवसअखेर ८ बाद १६८ धावा

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
10 hours ago
सुयशच्या शतकानंतरही गोवा संकटात

पणजी : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) डॉ. कॅ. के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामन्यावरील पकड गोवा संघाने तिसऱ्या दिवशी गमावली. गोव्याच्या पहिल्या डावातील ३३८ धावांना उत्तर देताना केएससीए प्रेसिडेंट्स इलेव्हन संघाने ७ बाद २१० अशा नाजूक स्थितीतून सावरताना ३९६ धावा करत गोवा संघावर ५८ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसअखेर गोव्याची ३३ षटकांत ८ बाद १६७ अशी नाजूक स्थिती झाली आहे. गोवा केवळ १०९ धावांनी आघाडीवर असून गोवा संघाचे केवळ २ गडी शिल्लक आहेत. हा सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविला जात आहे.
दुसऱ्या दिवशीचा नाबाद फलंदाज वेंकटेश याने ११ धावांवरून पुढे खेळताना ४९ धावा केल्या. यानंतरही केएससीए इलेव्हन संघाची ९ बाद २९५ अशी स्थिती झाली होती. शिखर शेट्टी (९२) व मोहसिन खान (नाबाद ५१) यांनी शेवटच्या गड्यासाठी १०१ धावांची भागीदारी करत संघाला फ्रंटफूटवर नेले. गोवा संघासाठी ललित यादव याने ७७ धावांत ३ गडी बाद केले. रुत्विक नाईक, अमूल्य पांड्रेकर यांनी प्रत्येकी २, तर वासुकी कौशिक, विजेश प्रभुदेसाई व दर्शन मिसाळ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
गोव्याच्या दुसऱ्या डावात सलामीवीर सुयश प्रभुदेसाई याने ७४ चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह १०० धावांची झंझावाती खेळी केली. याव्यतिरिक्त शिवेंद्र भुजबळ (१६), स्नेहल कवठणकर (१५), दर्शन मिसाळ (१३) यांनी दुहेरी धावसंख्या गाठली. प्रतिस्पर्धी संघाकडून मानवंथ कुमारने ३, तर मोहसिन खान व शुभांग हेगडेने प्रत्येकी २ आणि अक्षथ प्रभाकरने १ गडी बाद केला आहे.
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव :
१०२.२ षटकांत सर्वबाद ३३२
केएससीए प्रेसिडेंट्स इलेव्हन, पहिला डाव : ७ बाद २१० वरून — ११९.३ षटकांत सर्वबाद ३९६ (वेंकटेश एम. ४९, अक्षथ प्रभाकर ०, मानवंथ कुमार ४, शिखर शेट्टी ९२, मोहसिन खान नाबाद ५१, अवांतर १६; गोलंदाजी : ललित यादव ३-७७, अमूल्य पांड्रेकर २-४१, रुत्विक नाईक २-८२, विजेश प्रभुदेसाई १-६५, दर्शन मिसाळ १-६३, वासुकी कौशिक १-५६)
गोवा, दुसरा डाव : ३३ षटकांत ८ बाद १६७ (सुयश प्रभुदेसाई १००, मंथन खुटकर ५, शिवेंद्र भुजबळ १६, स्नेहल कवठणकर १५, ललित यादव ०, यश कसवणकर ०, दर्शन मिसाळ १३, अमूल्य पांड्रेकर ०, रुत्विक नाईक नाबाद ६, वासुकी कौशिक नाबाद १, अवांतर ११; गोलंदाजी : मानवंथ कुमार ३-२२, मोहसिन खान २-३०, शुभांग हेगडे २-४४, अक्षथ प्रभाकर १-२१)