नवी दिल्ली : लोकांना आर्थिक स्वातंत्र्याचे धडे देत, नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य देण्याचा आणि संपत्ती निर्माण करण्याचा सल्ला देणारे प्रसिद्ध लेखक व उद्योगपती रॉबर्ट कियोसाकी सध्या त्यांच्या कथित कर्जामुळे चर्चेत आले आहेत. ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकातून कोट्यवधी वाचकांना आर्थिक नियोजनाचे धडे देणाऱ्या कियोसाकी यांच्यावर तब्बल १० हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे.
कियोसाकी सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असून, त्यांच्या पोस्टमधून ते गुंतवणूक, व्यवसाय, आर्थिक स्वातंत्र्य आणि संपत्ती निर्मितीबाबत आपली मते मांडत असतात. मात्र, स्वतःच मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली असल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या आर्थिक धोरणांवर आणि कर्जाच्या वापराबाबतच्या विचारांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
कियोसाकी यांचा दृष्टिकोन पारंपरिक अर्थाने ‘कर्ज म्हणजे वाईट’ असा नसून, संपत्ती निर्माण करणाऱ्या मालमत्तेसाठी कर्जाचा वापर करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण कर्जाचा आकडा मोठा असला, तरी तो त्यांच्या वैयक्तिक आर्थिक अडचणींचे थेट द्योतक आहे का, याबाबत वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील वाचकांना पैशाचे व्यवस्थापन, गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्य याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे ज्यांच्या विचारांमुळे अनेकांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला, त्यांच्याच नावावर हजारो कोटींचे कर्ज असल्याची माहिती निश्चितच धक्कादायक ठरत आहे.
निष्कर्ष काढणे घाईचे
दरम्यान, १० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे नेमके स्वरूप, त्यामागील मालमत्ता आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता याबाबत अधिकृत आर्थिक तपशील समोर येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ कर्जाचा आकडा पाहून कियोसाकी आर्थिक संकटात आहेत, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरू शकते.


