पर्वरी गोळीबार; पोलीस आरोपींच्या मागावर, कोणत्याही क्षणी अटक

हल्ला करणाऱ्या आरोपींची ओळख पटली. तपास अंतिम टप्प्यात. हल्लेखोर आता पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
पर्वरी गोळीबार; पोलीस आरोपींच्या मागावर, कोणत्याही क्षणी अटक

पणजी : निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे (Neo Majestic Casino) संचालक श्रीनिवास नायक (Srinivas Nayak) यांच्यावर पर्वरी येथे झालेल्या गोळीबार (gun fire) प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यात गुन्हे शाखेला (क्राईम ब्रँच) अखेर यश आले आहे. कुठल्याही क्षणी या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

गेले चार दिवस पर्वरी पोलिसांना या प्रकरणात कोणतीही ठोस माहिती मिळाली नव्हती. त्यानंतर, राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेकडून हा तपास आता युद्धपातळीवर सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, परेश नाईक, निरीक्षक दत्तगुरू सावंत आणि निरीक्षक महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची तीन पथके काम करत आहेत. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांची कसून छाननी केली जात आहे. हल्लेखोर आता पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

शुक्रवारी रात्री झाला होता गोळीबार

शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४७ वाजण्याच्या सुमारास पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोच्या बाहेर संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले. यावेळी नायक यांच्या वैयक्तिक सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखून प्रत्युत्तरादाखल तीन राऊंड फायर केले. यामुळे घाबरलेल्या हल्लेखोरांनी महामार्ग ओलांडून विरुद्ध दिशेला पळ काढला. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पाच जणांचा सहभाग शक्य, सीसीटीव्हीत चेहरे कैद

या गोळीबार हल्ल्यात एकूण चार ते पाच जणांचा समावेश असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनास्थळी मुख्य हल्लेखोरांव्यतिरिक्त त्यांचे इतर दोन ते तीन साथीदारही हजर होते. त्यांनीच मुख्य हल्लेखोरांना पळून जाण्यास मदत केल्याचे तपासातून समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोरांनी या हल्ल्यापूर्वी दोन दिवस आधी घटनास्थळाची रेकी केली होती. आता या सर्वांचे चेहरे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

उत्तर प्रदेशातील चोरीची मोटारसायकल घटनास्थळी

हल्लेखोरांनी या घटनेसाठी वापरलेली आणि घटनास्थळीच सोडून पळ काढलेली एक ‘पल्सर’ मोटारसायकल पोलिसांना सापडली आहे. तपासणीत ही मोटारसायकल २०१४ मध्ये उत्तर प्रदेशातून चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. मात्र, इतक्या वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात चोरीला गेलेली ही दुचाकी हल्लेखोरांच्या हाती लागून ती गोव्यात कशी पोहोचली, हे पोलिसांसाठी एक नवे कोडे बनले आहे.

हेही वाचा
सर्व पहा