पणजी : चार वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ साली मोफत सिलिंडरची घोषणा केल्यानंतर आता योजनेची कार्यवाही होणार आहे. योजनेचे अर्ज ५ सप्टेंबरपर्यंत पंचायत कार्यालयात उपलब्ध होतील. अर्जासह कागदपत्रे सादर केल्यानंतर १० तारखेपर्यंत ३ हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
नुवे मतदारसंघात ‘माझे घर’ योजनेअंतर्गत सनद वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची योजना सरकारने जाहीर केली होती. यानंतर अद्याप या योजनेची कार्यवाही झाली नव्हती. अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या विनियोग विधेयकावर बोलताना योजनेची कार्यवाही सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
यासाठी नागरी पुरवठा खात्यासाठी १०० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे वर्षाला तीन मोफत सिलिंडर देणे शक्य होणार आहे. अर्ज केल्यानंतर १० तारखेपर्यंत खात्यात तीन सिलिंडरचे ३ हजार रुपये जमा होतील, अशी माहिती त्यांनी नुवे मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात दिली.


