पणजी : दिवाडी येथील पवित्र श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामादरम्यान महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत. कोटी तीर्थ ते माधवाची तळी या जुन्या मार्गावर १४व्या ते १६व्या शतकादरम्यानचे अवशेष आणि वास्तूंचे भाग आढळून आले आहेत. त्यामुळे या परिसरात प्राचीन मंदिर संकुल आणि धार्मिक मार्ग अस्तित्वात असल्याचे संकेत मिळाले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

या उत्खननात मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरील भागात पारंपरिकरीत्या कोरला जाणारा कीर्तिमुख, मंदिराच्या खांबाचा कोरीव शीर्षभाग (कॅपिटल) तसेच मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी वापरल्या जाणाऱ्या देवकोष्टकाचे काही भाग आढळले आहेत.
मंदिराची वेगवेगळ्या कालखंडांत पुनर्बांधणी झाल्याचे संकेत
विविध प्रकारच्या दगडांचा वापर आणि मंदिर स्थापत्यावरील वेगवेगळ्या कलाकृतींवरून या मंदिराची वेगवेगळ्या कालखंडांत पुनर्बांधणी झाल्याचे संकेत मिळत आहेत. पूर्वीच्या कदंबकालीन मंदिराचा विध्वंस झाल्यानंतर विजयनगर काळात या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आल्याची शक्यता या अवशेषांमुळे अधिक बळकट होत आहे. या शोधामुळे सप्तकोटेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक कालक्रमाला तसेच गोव्याच्या प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाला महत्त्वपूर्ण पुरातत्त्वीय आधार मिळाला आहे.
सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री
गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक आणि नागरी वारसा जतन, संवर्धित करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसमोर आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.


