फातोर्डा येथील बंद फ्लॅटला भीषण आग; लाखोंचे नुकसान

फातोर्डा येथील विल्सन प्लाझा इमारतीमधील एका बंद फ्लॅटला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. मडगाव अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर यशस्‍वी नियंत्रण मिळवले

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
24 mins ago
फातोर्डा येथील बंद फ्लॅटला भीषण आग; लाखोंचे नुकसान

मडगाव : फातोर्डा येथील विल्सन प्लाझा या बहुमजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील एका बंद फ्लॅटला अचानक आग लागल्याची दुर्घटना घडली. या घटनेत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. मडगाव अग्निशामक दलाने वेळेवर घटनास्थळी धाव घेत तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस व अग्निशामक दल अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुख्य नियंत्रण कक्षाकडून मडगाव अग्निशामक दलाला विल्सन प्लाझा इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अरुणकुमार तालेकर यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून घटनेच्या वेळी घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेलेले होते. फ्लॅटमधून अचानक दाट धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घरमालक आणि अग्निशामक दलाला याची कल्पना दिली.

अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सुझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची सुरुवात फ्लॅटच्या बेडरूममधून झाली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीच्या तीव्रतेमुळे घरातील एसी, कपाट, कपडे, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इतर गृहोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीच्या झळा शेजारील फ्लॅटपर्यंत पोहोचल्याने तेथेही किरकोळ नुकसान झाले. 

हेही वाचा
सर्व पहा