भारताची निवडणूक प्रक्रिया सर्वांत पारदर्शक : मुख्य निवडणूक आयुक्त

निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक स्तरावर पारदर्शकता असून भारतातील निवडणूक प्रक्रिया जगभरातील निवडणूक प्रक्रियांत सर्वांत पारदर्शक आहे. प्रत्येक मतदार हा या प्रक्रियेचा भाग आहे, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केले.


02nd September, 10:48 pm
भारताची निवडणूक प्रक्रिया सर्वांत पारदर्शक : मुख्य निवडणूक आयुक्त

कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार. सोबत इतर.
गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव : निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक स्तरावर पारदर्शकता असून भारतातील निवडणूक प्रक्रिया जगभरातील निवडणूक प्रक्रियांत सर्वांत पारदर्शक आहे. प्रत्येक मतदार हा या प्रक्रियेचा भाग आहे, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केले.
ज्ञानेश कुमार यांच्या गोवा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळे आणि निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ या विषयांवर दोन दिवस मडगाव येथील रवींद्र भवनात प्रादेशिक परिषदेचे आयोजन केले आहे. ‘ईएलसी अँड ईसीआयएनईटी - इंटरअ‍ॅक्शन विथ बीएलओज’ या परिषदेला ज्ञानेश कुमार यांनी उपस्थित राहून निवडणूक साक्षरता, बूथ लेव्हल ऑफिसर्सची भूमिका आणि डिजिटल निवडणूक व्यवस्थेबाबत संवाद साधला. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल, दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकारी एग्ना क्लिटस यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
ईसीआयएनईटी या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निवडणूकविषयक विविध सेवा आणि माहिती अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नांवरही परिषदेत भर देण्यात आला. तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दिशेने निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.
या परिषदेत बीएलओ, निवडणूक साक्षरता क्लबशी संबंधित प्रतिनिधी आणि निवडणूक यंत्रणेतील अधिकारी सहभागी झाले होते. मतदारांपर्यंत निवडणूकविषयक अचूक माहिती पोहोचविणे आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हा या संवादाचा प्रमुख उद्देश होता.
मतदार जागृतीमध्ये ईएलसी, बीएलओ महत्त्वाचे : ज्ञानेश कुमार
ज्ञानेश कुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मतदारयादी बीएलओंच्या सहकार्याने ठोस लेखापरीक्षण केल्यानंतरच तयार करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया मतमोजणी केंद्रावरील राजकीय पक्षांच्या एजंटांसमोरच पार पडते. मतदारांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी इलेक्ट्रॉल लिटरसी क्लब (ईएलसी) आणि बीएलओ यांची भूमिका महत्त्वाची आहे. मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती, मतदानाचे महत्त्व, तसेच उपलब्ध डिजिटल सुविधांबाबत प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याची गरज या परिषदेत अधोरेखित करण्यात आली.            

हेही वाचा
सर्व पहा