पोलीस खात्यात बनावट तक्रारींचा सुळसुळाट; पोलिसाचाच ‘उद्योग’ उघड

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
पोलीस खात्यात बनावट तक्रारींचा सुळसुळाट; पोलिसाचाच ‘उद्योग’ उघड

म्हापसा : पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात निनावी तसेच दुसऱ्यांच्या नावाने विविध ठिकाणी तक्रारी करण्याचे प्रकार वाढत असतानाच, या प्रकरणातील धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. एका आरटीआय कार्यकर्त्याच्या नावाचा गैरवापर करून पोलीस खात्याविरोधात काही तक्रारी एका पोलिस कर्मचाऱ्यानेच पोस्टाद्वारे पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच दक्षता खात्याकडे निनावी अथवा दुसऱ्यांच्या नावाने तक्रारी दाखल केल्या जात असल्याचे समोर आले आहे. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने आरटीआय कार्यकर्त्याच्या नावाने तक्रारी पाठवल्याचे निदर्शनास आले.

या प्रकारामुळे पोलीस खात्यातील (Goa Police) अंतर्गत वाद, वैयक्तिक आकस किंवा अन्य कारणांसाठी तक्रार यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्यांच्या नावाचा वापर करून खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या तक्रारी दाखल केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास म्हापसा पोलीस करत असून, तक्रारी कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठवल्या, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका नेमकी काय आहे, याचा तपास सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा