मडगाव : फातोर्डा येथील अमृतनगर परिसरात भरधाव बुलेट आणि क्रेटा कारची धडक होऊन १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला बुलेट चालविण्यास दिल्याप्रकरणी त्याचे वडील रुई मिनेझिस यांच्याविरुद्ध फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

या अपघातात बुलेटस्वार अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात तोंड, छाती आणि पोटाच्या भागात झालेल्या गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलीस तपासात मृत मुलगा वाहन चालविण्यासाठी कायदेशीर वयाचा नसतानाही त्याचे वडील रुई मिनेझिस यांनी त्याला बुलेट चालविण्यास दिल्याचे समोर आले. या प्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल संजय सावंत देसाई यांच्या तक्रारीवरून वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.), २०२३ मधील कलम १०६ (१), तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १९९ ए (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातवशील देविदास हे फातोर्डा पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.


