राज्यात दिवसाला ४० जणांना कुत्र्यांचा चावा

पशूसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
9 hours ago
राज्यात दिवसाला ४० जणांना कुत्र्यांचा चावा

पणजी : राज्यात १ जानेवारी २०२२ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कुत्रा चावण्याच्या तब्बल ६८,५६८ घटनांची नोंद झाली. याचाच अर्थ महिन्याला सरासरी १,२४७ तर दिवसाला सरासरी ४० हून अधिक जणांचा कुत्र्याने चावा घेतला. ही आकडेवारी केवळ सरकारी इस्पितळातील आहे. विधानसभेत पशूसंवर्धन मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे.

आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी याविषयी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

उत्तरातील माहितीनुसार, २०२२ मध्ये राज्यात कुत्रे चावण्याच्या ८,०५७ घटनांची नोंद झाली होती. २०२३ मध्ये ११,९०४ घटनांची नोंद झाली. २०२४ मध्ये १७,२३० तर, २०२५ मध्ये हा आकडा वाढून १९,३५५ इतका झाला. तर १ जानेवारी ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान १२,०२१ जणांना कुत्रे चावले. वरील कालावधीत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात कुत्रे चावण्याच्या सर्वाधिक ८,६८२ घटनांची नोंद झाली होती. त्या खालोखाल कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७,७७९ तर मडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ३,३०० घटनांची नोंद झाली.

वरील कालावधीत पणजी नागरी आरोग्य केंद्रात कुत्रे चावण्याच्या २,०४१ घटनांची नोंद झाली. चिखली उपजिल्हा इस्पितळात ४,२३०, काणकोण प्राथमिक आरोग्य केंद्रात २,६९३, धारबांदोडा आरोग्य केंद्रात ३,६०८, साखळी आरोग्य केंद्र २,०११, तर केपे आरोग्य केंद्रात ४,२३० कुत्रे चावण्याची घटनांची नोंद झाली. वरील कालावधीत चिंबल, रायबंदर, फोंडा येथील आरोग्य केंद्रात कुत्रे चावण्याच्या घटना तुलनेने कमी असल्याचे उत्तरात म्हटले आहे.

चार वर्षात ८० हजार व्यक्तींना लस

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य खात्याने राज्यात २०२२ ते २०२५ या चार वर्षांच्या कालावधीत ८०,३८९ जणांना रेबीज विरोधी लस देण्यात आली आहे. तर, १ जानेवारी ते ३१ जुलै २०२६ दरम्यान ७,११८ जणांना अशी लस दिली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा