केरळ-कर्नाटक : कारच्या गुप्त बॉक्समध्ये सापडल्या नोटाच नोटा; १.४४ कोटी जप्त

पोलिसांची मोठी कारवाई; तिघांना अटक; केरळ-कर्नाटक सीमेवरील थोलपेट्टी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका कारमधून तब्बल १ कोटी ४४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. विशेष म्हणजे, ही कोट्यवधींची रक्कम कारच्या ड्रायव्हरच्या सीटखाली तयार करण्यात आलेल्या गुप्त बॉक्समध्ये लपवून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
44 mins ago
केरळ-कर्नाटक : कारच्या गुप्त बॉक्समध्ये सापडल्या नोटाच नोटा; १.४४ कोटी जप्त

वायनाड : केरळ-कर्नाटक सीमेवरील थोलपेट्टी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका कारमधून तब्बल १ कोटी ४४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. विशेष म्हणजे, ही कोट्यवधींची रक्कम कारच्या ड्रायव्हरच्या सीटखाली तयार करण्यात आलेल्या गुप्त बॉक्समध्ये लपवून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

थिरुनेल्ली पोलीस आणि जिल्हा ‘स्पेशल अँटी ड्रग्स टीम’च्या पथकाने थोलपेट्टी परिसरात कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली होती. यावेळी संशय आल्याने एका कारची कसून झडती घेण्यात आली. कारची बारकाईने तपासणी करत असताना पोलिसांना ड्रायव्हरच्या सीटखाली संशयास्पद गुप्त जागा आढळून आली.

ही जागा उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये एक सीक्रेट बॉक्स असल्याचे समोर आले. बॉक्स उघडताच पोलिसांना नोटांचे बंडल दिसून आले. मोजणी केल्यानंतर या बॉक्समध्ये तब्बल १,४४,५०,००० रुपये इतकी रोकड लपवून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

अटक केलेल्यांचे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळपर्यांत नेटवर्क 

या कारमध्ये त्यावेळी तिघे जण प्रवास करत होते. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रभू राज (कोझिकोड जिल्ह्यातील वडकारा परिसरातील नदक्कावू येथील रहिवासी), स्वप्निल, पन्नूर येथील रहिवासी आणि राहुल, महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पैशांचा स्रोत कोणता? पोलिसांकडून तपास सुरू

एवढी मोठी रोख रक्कम नेमकी कुठून आली, ती कुणी दिली आणि ती कोणत्या कारणासाठी वाहून नेली जात होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच ही रक्कम नेमकी कुठे पोहोचवली जाणार होती आणि तिचा लाभार्थी कोण होता, याचाही शोध घेतला जात आहे.

कारमध्ये गुप्त जागा तयार करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड लपवण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.थोलपेट्टी हा कर्नाटकातून केरळमध्ये प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रोकड वाहतूक केली जात होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

तपासानंतर उघड होणार नेटवर्क 

दरम्यान, जप्त केलेल्या ₹१.४४ कोटींच्या रकमेचा नेमका स्रोत आणि या पैशांमागील संपूर्ण नेटवर्क तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा