पणजी : गोवा शासनाच्या 'कदंबा वाहतूक महामंडळा'च्या बससेवेने आपल्या वक्तशीरपणाने आणि दर्जेदार सेवेने प्रवाशांचे मन जिंकले आहे. महाराष्ट्रातील वकील अॅड. नीलेश महादेव वाटवे यांनी सोशल मीडियाद्वारे सावंतवाडी ते मुंबई दरम्यानचा आपला अत्यंत सुखद प्रवास अनुभव शेअर करत कदंबा बससेवेचे भरभरून कौतुक केले आहे. गोव्याच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खासगी ट्रॅव्हल्सऐवजी सरकारी 'कदंबा' बससेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अॅड. नीलेश वाटवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सावंतवाडी येथून रात्री ८:३० वाजता मुंबई सेंट्रलसाठी कदंबा बस पकडली होती. रस्त्यावरील वाहतूक आणि प्रवासाचे अंतर विचारात घेता, सकाळी वेळेत पोहोचण्याबाबत त्यांना साशंकता होती. मात्र, कदंबा बसच्या चालकाने अत्यंत सुरक्षितपणे आणि वेळेचे तंतोतंत भान ठेवत सकाळी ६ वाजताच बस मुंबई सेंट्रलला पोहोचवली. या उत्कृष्ट समयसूचकतेमुळे त्यांचा पुढील वेळ वाचला आणि प्रवासही आरामदायी झाला.
खासगी बसेसच्या अनिश्चित वेळा आणि महागड्या भाड्याच्या तुलनेत, सरकारी उपक्रम असूनही कदंबा महामंडळाने जपलेली वक्तशीरपणाची परंपरा कौतुकास्पद असल्याचे वाटवे यांनी नमूद केले. "प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर सेवा देणाऱ्या या चालक-वाहकांना आणि महामंडळाला प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे," असे सांगत त्यांनी कदंबाच्या चालक बांधवांचे आभार मानून त्यांना सलाम केला. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा अनुभव मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून, प्रवाशांकडूनही या सरकारी सेवेला पसंती दर्शवली जात आहे


