पणजी : मिराबाग, सावर्डे येथे होणाऱ्या बंधाऱ्याला विरोध करण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनकाळात सभागृहात जाऊन पोस्टर दाखवल्यप्रकरणी चार जणांना विधानसभा भवन परिसरात प्रवेशबंदी घालण्यात आली होती. यापूर्वीचा हा आदेश सभापती गणेश गावकर यांनी मागे घेतला आहे.
संबंधित चारही जण वारंवार अशा प्रकारचे कृत्य करणारे नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सभापती गावकर यांनी स्पष्ट केले. विधानसभा अधिवेशनादरम्यान सहा महिन्यामागे ६ मार्च रोजी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चारजणांनी सभागृहातील प्रेक्षक गॅलरीतून पोस्टर दाखवल होते.
त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर सभापती गणेश गावकर यांनी या चारही जणांना विधानसभा भवन परिसरात येण्यास प्रवेश बंदी घातली होती. मिराबाग येथील बंधाऱ्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांपैकी आपा नाईक, उपेंद्र नाईक, उमेश नाईक, हेमंत भंडारी या चारजणांचा त्यात समावेश होता. विधानसभा परिसरात किंवा सभागृहाच्या आसपास पुन्हा अशा प्रकारचे आंदोलन अथवा शिस्तभंगाचे कृत्य करू नये, असा स्पष्ट इशाराही सभापती गावकर यांनी संबंधितांना त्यावेळी दिला होता.


