आके येथे महिलेची सोनसाखळी हिसकावली; अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद

मडगावमधील आके-आल्त येथे रस्त्याने चालणाऱ्या महिलेची १.९० लाखांची सोन्याची साखळी दुचाकीस्वाराने पळवली. कर्नाटक पासिंग गाडीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
आके येथे महिलेची सोनसाखळी हिसकावली; अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद

मडगाव : आके-आल्त परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका चोरीच्या घटनेत ५४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकावून पळवली. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून, या प्रकरणी मडगाव पोलीस स्टेशनात अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस संशयिताचा कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेरॉन फर्नांडिस मिनेझिस (वय ५४) या बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आके-आल्त येथील कॉस्ता फॅक्टरीजवळून रस्त्याने चालत जात होत्या. त्यावेळी चेहऱ्यावर रुमाल बांधलेला आणि डोक्यात हेल्मेट घातलेला एक अज्ञात इसम कर्नाटक राज्याची नोंदणी असलेली दुचाकी घेऊन तेथे आला. त्याने अचानक शेरॉन यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि तिला जोडलेले क्रॉसचे मेडल बळजबरीने हिसकावले आणि दुचाकीवरून वेगाने पसार झाला. चोरीला गेलेल्या या ऐवजाची एकूण किंमत सुमारे १ लाख ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील स्थितीची पाहणी केली असून तपासादरम्यान संशयिताच्या दुचाकीचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला आहे. या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्याचा माग काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. मडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष गावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा