मडगाव : दक्षिण गोव्यातील कुटबण मच्छीमारी जेटी परिसरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आणि साथरोगांचा प्रसार थांबवण्यासाठी मत्स्यव्यवसाय संचालनालयाने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. जेटी परिसर तसेच मच्छीमारी बोटींवर आरोग्यदायी वातावरण राखण्याच्या उद्देशाने खात्याने १४ कलमी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांचे सर्व बोट मालक, तांडेल आणि खलाशांनी काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश संचालनालयाने दिले आहेत.
गेल्या वर्षी कुटबण जेटीवर साथरोगांमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाही सुरुवातीलाच डेंग्यूचा शिरकाव झाल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी बोटी ताडपत्रीने झाकणे, वापरात नसलेल्या लहान बोटी व क्रेट्स उलटे करून ठेवणे आणि बोटीच्या फेंडरसाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या टायर्सना छिद्रे पाडणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, जेटी आणि बोटींवरील जुने टायर, थर्माकोलचे बॉक्स, प्लास्टिकच्या बाटल्या व इतर भंगार साहित्य त्वरित हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्यविषयक उपाययोजनांचा भाग म्हणून बोटीवर काम करणाऱ्या सर्व खलाशांची प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नियमित तपासणी करून त्यांच्याकडे 'आरोग्य कार्ड' असल्याची खात्री करणे अनिवार्य केले आहे. जेटी परिसरात किंवा उघड्यावर स्नान व शौचास बसण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय उपचार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक बोट मालकाने आपल्या बोटीसाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आणि त्याचे नाव व संपर्क क्रमांक जेटीवरील मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्याकडे जमा करणे सक्तीचे करण्यात आले आहे. सर्व बोटधारकांनी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय संचालकांनी केले आहे.


