पणजी : २०१९ मधील भारत-पाकिस्तान हवाई संघर्षादरम्यान शत्रूचे लढाऊ विमान पाडून शौर्य गाजवणारे भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि ‘वीर चक्र’ विजेते अभिनंदन वर्धमान आता नागरी विमान वाहतूक क्षेत्रात दाखल झाले आहेत. गोव्यातील प्रादेशिक विमानसेवा ‘फ्लाय९१’ (‘FLY91’ ) मध्ये ते पायलट म्हणून रुजू झाले आहेत.
अभिनंदन वर्धमान ऑगस्ट महिन्यात ‘फ्लाय९१’मध्ये सामील झाले. भारतीय हवाई दलातील प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवेनंतर त्यांनी नागरी विमानसेवेत नवी जबाबदारी स्वीकारली आहे. २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या हवाई संघर्षात पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडल्यानंतर अभिनंदन वर्धमान देशभर चर्चेत आले होते. या शौर्याबद्दल त्यांना भारत सरकारने ‘वीर चक्र’ या युद्धकाळातील शौर्य पुरस्काराने सन्मानित केले.
हवाई दलातील अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर आता ते ‘फ्लाय९१’’च्या माध्यमातून प्रवासी विमानसेवेत योगदान देणार आहेत. त्यांच्या नव्या कारकिर्दीमुळे गोव्यातील प्रादेशिक विमानसेवेलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


