राज्यात बांगडे, तारले, सुंगटांच्या उत्पादनात भरघोस वाढ

मासळी निर्यातीतही राज्याची मोठी झेप : इसवण, लेपोत किंचित घट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd September, 08:29 pm

राज्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२५-२६ मध्ये सागरी आणि गोड्या पाण्यातील मासळीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. एका वर्षात सागरी मत्स्य उत्पादन ५.४० टक्क्यांनी, तर गोड्या पाण्यातील मासळी उत्पादन ११.३२ टक्क्यांनी वाढले आहे. या कालावधीत बांगडे, तारले, सुंगटे, पापलेट आणि खेकडे आदींच्या उत्पादनात वाढ झाली; तर इसवण, मोरी आणि लेपो या माशांचे उत्पादन किंचित कमी झाले आहे.

राज्यात २०२४-२५ मध्ये १.२८ लाख टन मासळीचे उत्पादन झाले होते. २०२५-२६ मध्ये त्यात वाढ होऊन ते १.३५ लाख टनांवर पोहोचले आहे. त्यामुळे राज्यातील सागरी मत्स्य उत्पादनात एका वर्षात ५.४० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

बांगडे, तारले आणि सुंगटांचे उत्पादन वाढले

उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये बांगड्याचे उत्पादन ४३,७२८ टन होते, जे २०२५-२६ मध्ये वाढून ४४,२५२ टन झाले. याच काळात तारल्याचे उत्पादन २०,७०५ टनांवरून २०,७८० टन, तर सुंगटांचे उत्पादन १०,०७१ टनांवरून १३,००६ टनांपर्यंत वाढले.

दुसरीकडे, २०२४-२५ मध्ये २,७९७ टन असलेले इसवणचे उत्पादन २०२५-२६ मध्ये १,४९८ टनांवर घसरले. तसेच एका वर्षात मोरीचे उत्पादन २६ टनांनी आणि माणकीचे उत्पादन १,८८० टनांनी कमी झाले आहे.

सागरी मत्स्य उत्पादनात ५.४० टक्के वाढ२०२४-२५ मध्ये राज्यात १.२८ लाख टन सागरी मासळीचे उत्पादन झाले होते. २०२५-२६ मध्ये हे उत्पादन वाढून १.३५ लाख टनांवर पोहोचले.

गोड्या पाण्यातील मासळी उत्पादनातही वाढ

राज्यात २०२४-२५ मध्ये समुद्र वगळता गोड्या पाण्यातील मासळीचे उत्पादन ९,०६५.५६ टन होते. २०२५-२६ मध्ये ते वाढून १०,०९२ टन झाले. यादरम्यान मध्यम आणि मोठे सुंगटे, कालवे आणि तामसो यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे; तर शेवटे, लहान सुंगटे, चणक आणि तिसरे यांचे उत्पादन कमी झाले आहे.

मच्छीमारांना ५१ कोटींचे अनुदान

राज्यातील मासळी उत्पादन वाढावे, यासाठी मत्स्योद्योग खात्यातर्फे विविध योजना राबवल्या जातात. याअंतर्गत मच्छीमारांना अनुदानही दिले जाते. आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यातील मच्छीमारांना खात्यातर्फे एकूण ५१.४१ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

मत्स्य निर्यातीत ९७१ कोटींची उलाढाल

उत्पादनाबरोबरच मासळी आणि संबंधित मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाणही वाढले आहे. २०२४-२५ मध्ये गोव्यातून ८९० कोटी रुपये मूल्याचे ४५,५६९ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन निर्यात झाले होते. तर, २०२५-२६ मध्ये यात वाढ होऊन ९७१ कोटी रुपये मूल्य असणारे ४९,३५८ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन निर्यात करण्यात आले.

निर्यातीतही वाढ२०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये मत्स्य उत्पादनाची निर्यात ३,७८९ मेट्रिक टनांनी वाढली. निर्यातमूल्यही ८९० कोटींवरून ९७१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.

गोव्याच्या समुद्रकिनारी १,२६१ जीव भरकटले

गेल्या तीन वर्षांत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर १,२०० हून अधिक समुद्री जीव भरकटल्याची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक ७२ टक्के प्रकरणे दक्षिण गोव्यात नोंदवली गेली आहेत. बहुतांश समुद्री जीव नैसर्गिक कारणांमुळे समुद्रकिनारी भरकटतात, अशी माहिती वन खात्याने दिली.

गोव्यात २०२३ ते २०२५ या कालावधीत एकूण १,२६१ समुद्री जीव भरकटल्याची नोंद झाली. त्यापैकी ९१५ प्रकरणे दक्षिण गोव्यात, तर ३४६ प्रकरणे उत्तर गोव्यात नोंदवली गेली आहेत.

दक्षिण गोव्यात सर्वाधिक प्रकरणे

२०२३ ते २०२५ या तीन वर्षांत दक्षिण गोव्यात ९१५ समुद्री जीव भरकटल्याची नोंद झाली. उत्तर गोव्यात ३४६ प्रकरणे नोंदवली गेली असून, एकूण १,२६१ समुद्री जीव किनाऱ्यावर आढळले.

हेही वाचा
सर्व पहा