बेळगाव : सोन्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. मात्र, बेळगाव जिल्ह्यातील इंचल गावात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. गावात सुरू असलेल्या खोदकामादरम्यान एका मडक्यात तब्बल १४ सोन्याची प्राचीन नाणी सापडली. मात्र, ही नाणी स्वतःकडे न ठेवता मजुरांनी ती तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात जमा केली.
बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावात बीसीएम वसतिगृहाजवळ व्ही.बी.जी. रामजी योजनेंतर्गत खोदकामाचे काम सुरू होते. माती खणत असताना मजुरांना एक मडके आढळले. मडके उघडल्यानंतर त्यामध्ये सोन्याची ।४ नाणी असल्याचे समोर आले. सोन्याची नाणी सापडल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली. मात्र, मजुरांनी कोणताही मोह न बाळगता ही नाणी ग्रामपंचायत कार्यालयात जमा केली.
त्यानंतर ग्रामपंचायतीने ही नाणी तहसीलदारांकडे सुपूर्द केली आहेत. नाण्यांचा नेमका कालखंड आणि ऐतिहासिक महत्त्व याबाबत तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे.
नाण्यांवर हत्तीची प्रतिमा
या सोन्याच्या नाण्यांवर हत्तीची प्रतिमा दिसून येत आहे. या प्रतिमेवरून ही नाणी पश्चिम गंगांच्या तळकाड राजवटीशी किंवा विजयनगर साम्राज्याच्या काळाशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही नाणी दहाव्या ते पंधराव्या शतकातील असू शकतात. काही नाण्यांच्या दर्शनी भागावर अलंकारयुक्त हत्तीचे चित्र असल्याचे दिसून आले आहे.
पश्चिम गंगा राजवटीच्या राजचिन्हाशी हत्तीच्या प्रतिमेचा संबंध असल्याने या नाण्यांना मोठे ऐतिहासिक महत्त्व असण्याची शक्यता आहे. मजुरांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे. सापडलेल्या प्राचीन नाण्यांची पंचक्रोशीसह संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.


