भोपाळ : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ११ जण मृत्यू पावले. ३५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात काहीजणांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले आहे.
विषारी दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती ढासळल्याची माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली. दारूचे सेवन केल्यानंतर काही वेळातच अनेक जण उलट्या, चक्कर येऊन बेशुद्ध पडले. काही जण निळे पडले, तर स्नायू आखडल्याचीही लक्षणे दिसून आली. या घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र अधिकृतपणे १० मृत्यूंची पुष्टी केली आहे.
घटनेनंतर प्रशासन आणि आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात या प्रकरणाचा संबंध उत्तर प्रदेशातील अवैध दारू पुरवठा करणाऱ्या टोळीशी असल्याचे समोर आले आहे.
नेमके काय घडले?
शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी पहाटेच्या सुमारास बांदा तहसीलमधील बारज, नौंराज, घुगरखुर्द, पाटन आणि दिलोना या गावांमध्ये ही घटना घडली. गावातील काही नागरिकांनी ठेक्यावरून दारू खरेदी करून तिचे सेवन केले. त्यानंतर काही वेळातच उलट्या, चक्कर येऊन बेशुद्ध पडले.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी पीडितांना बांदा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात नेत असतानाच काहींचे अंग निळे पडल्याचे सांगण्यात आले. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर २४ रुग्णांना सागरमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले.
डॉक्टरांच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, काही रुग्णांमध्ये अंग निळे पडणे आणि स्नायू आखडणे अशी गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
आरोग्य विभागाकडून गावांमध्ये तपासणी
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने बाधित गावांमध्ये वैद्यकीय पथके पाठवली आहेत. गेल्या २४ ते ४८ तासांत दारूचे सेवन केलेल्या नागरिकांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांनी नागरिकांना कोणतीही लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे. उलट्या, डोकेदुखी, ताप, चक्कर किंवा अन्य अस्वस्थता जाणवत असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा बांदा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे निर्देश
या घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दुःख व्यक्त केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनीही चौकशीसाठी उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याला घटनास्थळी रवाना केले आहे.
दरम्यान, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने परिसरात छापेमारी सुरू केली आहे. काही दारूची दुकाने सील करण्यात आली आहेत.
विषारी दारूमागे उत्तर प्रदेश कनेक्शन?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या प्रकरणाचा संबंध उत्तर प्रदेशातील अवैध दारू पुरवठा करणाऱ्या टोळीशी असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूर पोलिसांनी यापूर्वी अवैध दारूचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीला अटक केली होती.
ही टोळी उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या सागर जिल्ह्यातील गावांमध्ये बनावट दारू तयार करून कमी किमतीत विकत असल्याचा आरोप आहे. दारू अस्सल असल्याचा भास निर्माण करण्यासाठी बनावट रॅपर, झाकण आणि क्यूआर (QR) कोड वापरले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
चारचाकी वाहने आणि मोटारसायकलींच्या माध्यमातून ही बनावट दारू सीमावर्ती गावांमध्ये पोहोचवली जात असल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तपासाचा वेग वाढवला आहे. या अवैध दारू सिंडिकेटमागील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील पुढील निष्कर्षांनंतर या दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


