पणजी : गोव्यात फुप्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत आहे. गोव्यात दरवर्षी फुप्फुसाच्या कर्करोगाचे सुमारे १२० ते १५० नवीन रुग्ण आढळतात. साधारण एका दशकापूर्वी या रुग्णांमध्ये ९० टक्के पुरुष आणि १० टक्के महिला होत्या. मात्र मागील काही वर्षांत हे प्रमाण बदलून ६० टक्के पुरुष आणि ४० टक्के महिला असे झाले आहे. यामागील कारणांचा तातडीने अभ्यास करण्याची मागणी 'नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर टोबॅको इराडिकेशन' (नोट) इंडिया या संस्थेने केली आहे.
नोट इंडियाचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले की, राज्यात प्रत्यक्ष धुम्रपानासह अप्रत्यक्ष धुम्रपानाचा (सेकंड-हँड स्मोक) धोका वाढत आहे. महिलांचे प्रमाण वाढणे हा एक अत्यंत महत्त्वाचा साथीचा (एपिडिमियोलॉजिकल) बदल आहे आणि याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एखादी महिला धुम्रपान करत नसेल, तर ती तंबाखूजन्य आजारांपासून सुरक्षित आहे असे नाही. घर, कामाचे ठिकाण किंवा इतर बंदिस्त जागांवर होणाऱ्या अप्रत्यक्ष धुम्रपानाचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नये : डॉ. साळकर
राज्य सरकार, आरोग्य खाते, कॅन्सर नोंदणी केंद्र व वैद्यकीय संस्थांनी या वाढत्या प्रमाणाचा सखोल अभ्यास करावा. धुम्रपान न करणाऱ्या महिलांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग वाढण्यामागे विविध कारणे शोधणे आवश्यक आहे. घर आणि कामाच्या ठिकाणी होणारे अप्रत्यक्ष धुम्रपान, घरातील, बाहेरील हवेचे प्रदूषण, धुम्रपान न करणाऱ्या रुग्णांची वैद्यकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमी आदींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या वाढीच्या कारणांबद्दल थेट निष्कर्षावर पोहोचू नये. परंतु या इशाऱ्याकडे दुर्लक्षही करू नये असे डॉ. साळकर यांनी सांगितले.
४४.४ कोटी लोक धुम्रपानामुळे अप्रत्यक्ष प्रभावित
भारतात अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. १९९० मध्ये यामुळे २.१७ लाख जणांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये ही संख्या वाढून ३.२५ लाख पेक्षा अधिक झाली. याकाळात महिलांचे मृत्यू १.१३ लाख वरून १.५६ लाख तर पुरुषांचे मृत्यू १.०४ लाख वरून १.६८ लाख वर पोहोचले आहेत. २०२३ मध्ये भारतातील सुमारे ४४.४ कोटी लोक अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे प्रभावित झाले होते.


