मडगाव: दक्षिण गोव्यातील चिंचणी-देवसू ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरू असताना, आपचे कार्याध्यक्ष आणि तथा गावचे सरपंच जेर्सन गोम्स यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सामाजिक कार्यकर्ते माल्कम परेरा यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून (AAP) करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत कार्यालयात उपस्थित असलेल्या माल्कम परेरा यांनी सरपंच गोम्स यांच्यावर अचानक चाल करून जात हल्ला केला. या हल्ल्यात गोम्स गंभीररीत्या जखमी झाले. तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी त्यांना तातडीने बल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या विशेष देखरेखीत उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, संशयित आरोपी माल्कम परेरा याच्याविरोधात सरपंच जेर्सन गोम्स यांनी यापूर्वीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परेरा यांनी याआधीही पंचायत कार्यालयात बेकायदेशीरपणे प्रवेश करून व्हिडिओ शूटिंग करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.


